Video : एक अशीही गटारी ! गंगाखेड पालिकेच्या सभागृहातच रंगली ओली पार्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 08:51 PM2021-08-10T20:51:43+5:302021-08-10T21:08:48+5:30
नगरपालिकेच्या स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहात ८ ऑगस्ट रोजी रात्री राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांना चिकन, मटनसह ओली पार्टी दिल्याचे सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आले आहे.
गंगाखेड ( परभणी ) : गटारी अमावास्येनिमित्त येथील नगरपालिकेच्या सभागृहातच ओली पार्टी रंगल्याचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आला असून, या प्रकाराने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे या पार्टीत सहभागी झालेल्यांवर काय कारवाई होते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
येथील नगरपालिकेच्या स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहात ८ ऑगस्ट रोजी रात्री राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांना चिकन, मटनसह ओली पार्टी दिल्याचे सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आले आहे. आगामी काळात पालिकांच्या निवडणुका आहेत. सध्याच्या पदाधिकाऱ्यांचा केवळ चार महिन्यांचाच कार्यकाळ शिल्लक आहे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी गटारी अमावास्येचा मुहूर्त साधत नगरपालिकेच्या सभागृहातच ही ओली पार्टी देण्यात आली. शहरातील गटारींची स्वच्छता करण्याची जबाबदारी असणाऱ्या पालिकेच्या कार्यालयातच गटारी केल्याने शहरवासीयांत मात्र संताप व्यक्त केला जात आहे.
रविवारी नगरपालिका कार्यलय बंद असते. रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक असताना सभागृहात पार्टी होते, ही बाबच नीतिमूल्यांची पायमल्ली करणारी आहे. राजकारणातील प्रतिष्ठा धुळीला मिळवून गटारी अमावास्येचा आनंद लुटण्यासाठी नगरपालिकेच्या सभागृहाचा वापर झाल्याने अशा कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. ज्या सभागृहात शहर विकासाचे निर्णय घेतले जातात, जे सभागृह आदराचे, पावित्र्याचे व्यासपीठ म्हणून ओळखले जाते, त्याच सभागृहाचा मांस, मद्याच्या ओल्या पार्टीसाठी वापर होतो, हे अशोभनीय आहे, त्यामुळे आता या प्रकरणात जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, नगरपालिकेच्या स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहात झालेल्या ओल्या पार्टी प्रकरणी मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्यासह जबाबदार असलेल्या व पार्टीत सहभागी असलेल्या सर्वांवर कार्यवाही करावी, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, नगरसेविका सीमा राखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
चित्रफीत चुकीच्या पद्धतीने प्रसारित केली : मुख्याधिकारी
गंगाखेड येथील नगरपालिकेतील स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात गटारी साजरी केल्याबाबत प्रसारित केलेली चित्रफीत चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात आल्याचे स्पष्टीकरण गंगाखेड येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे यांनी स्वतंत्र प्रेस नोट काढून केले आहे.
नगरपालिकेच्या सभागृहात गटारी साजरी केल्याची चित्रफीत प्रसारमाध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर या चित्रफितीची शहनिशा करण्यात आली. त्यात ही चित्रफीत चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आली आहे, असे दिसते. असे असले तरी या संदर्भात चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी संतोष लोमटे यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले.
या संदर्भात मुख्याधिकारी लोमटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही; तर दुसरीकडे, नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया घेतली असता, त्यांनी सांगितले, त्या पार्टीची किंवा सीसीटीव्ही फुटेजची माहिती नाही. मुख्याधिकाऱ्यांना माहिती विचारा, असे त्यांनी सांगितले.