परभणीत केवळ २ हजार मजुरांच्याच हाताला काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 01:04 PM2020-10-16T13:04:02+5:302020-10-16T13:06:41+5:30
MGNREGA News मजुरांची नोंदणी लक्षात घेता कामांची संख्या वाढविण्याची गरज आहे.
परभणी : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात नोंदणी केलेल्या मजुरांची संख्या लाखोंच्या घरात आहे. मात्र, या योजनेच्या माध्यमातून केवळ २ हजार मजुरांनाच काम उपलब्ध झाले आहे.
मागील आठवड्यात या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात २७२ कामे सुरू होती. या कामांवर केवळ २ हजार २६० मजूर काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत आणि शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून कामे उपलब्ध करून दिली जातात. शासकीय यंत्रणांनी मोठी कामे हाती घेतली तर जास्तीत जास्त मजुरांना काम उपलब्ध होवू शकते. मात्र यंत्रणा या संदर्भात उदासीन असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात यंत्रणांच्या माध्यमाून २२१ कामे सुरू करण्यात आली. त्यात रोपवाटिका, वृक्ष लागवड, वैयक्तीक वृक्ष लागवड, तुती लागवड, फळबाग लागवड इ. कामांचा समावेश आहे. काही यंत्रणांनीही तर अद्याप कामेच उपलब्ध केली नाहीत. मजुरांची नोंदणी लक्षात घेता कामांची संख्या वाढविण्याची गरज आहे.