९० कोटींपैकी १८ कोटी सेलूला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:13 AM2021-01-10T04:13:42+5:302021-01-10T04:13:42+5:30
परभणी : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या अनुदानाचा ९० कोटी २० लाख रुपयांचा दुसरा टप्पा जिल्ह्यात प्राप्त झाला ...
परभणी : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या अनुदानाचा ९० कोटी २० लाख रुपयांचा दुसरा टप्पा जिल्ह्यात प्राप्त झाला असून, त्यापैकी सर्वाधिक १८ कोटी ७२ लाख रुपये सेलू तालुक्याला वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकावर पाणी सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली होती. या नुकसानापोटी मदत द्यावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली. त्यानुसार मदतनिधी जाहीर करण्यात आला. पहिल्या टप्प्यात ९० कोटी २० लाख रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले. हा सर्व निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निधीची जिल्हावासीयांना प्रतीक्षा लागली होती. तो निधीही आता प्राप्त झाला आहे.
शुक्रवारी मदतनिधी जिल्ह्याला प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने तालुक्यांसाठी हा निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार परभणी तालुक्याला ५ कोटी ३१ लाख २१ हजार, सेलू तालुक्याला १८ कोटी ७२ लाख ६ हजार, जिंतूर १६ कोटी ९८ लाख ९० हजार, पाथरी : १४ कोटी २६ लाख १५ हजार, मानवत १० कोटी ९८ लाख ५९ हजार, सोनपेठ ८ कोटी ५९ लाख ४२ हजार, गंगाखेड ११ लाख ३९ हजार, पालम ३ कोटी ४४ लाख ४५ हजार आणि पूर्णा तालुक्यासाठी ११ कोटी ८८ लाख ६९ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
वाढीव दराने २८ कोटी
राज्य शासनाने पिकांसाठी नुकसानीची मदत जाहीर केली आहे. ६ हजार ८०० रुपये प्रतिहेक्टरी आणि बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टर मदत देण्यासाठी नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे शासनाने जाहीर केलेल्या ३ हजार २०० रुपये वाढीव दराने २८ कोटी ८५ लाख २८ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.