सेलू शहरातील विद्यानगर भागात दायमा कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील पीयूष दायमा व दीपक दायमा या दोघांना सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास असल्याने १७ एप्रिल रोजी त्यांची कोरोना चाचणी केली. त्यात दोघेही पॉझिटिव्ह आले. त्यानंतर कुटुंबातील राखी दायमा, बबिता दायमा, शुभम दायमा, रामेश्वर दायमा, दुर्गा दायमा, रतन दायमा, नंदकिशोर दायमा, कीर्ती दायमा, सूरज दायमा, कोमल दायमा या दहा सदस्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अख्खे कुटुंब कोरोनाबाधित झाल्याने घरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु सर्वांनी विचार विनिमय करून घरीच नियमित औषध घेऊन कोरोनावर मात करण्याचा निश्चय केला. शासकीय कोविड सेंटरमधून दिलेले औषध वेळेवर घेतले. त्याचबरोबर योगासने व टीव्हीवरील मनोरंजन कार्यक्रम पाहत कोरोना आजाराला मनातून वेगळे करीत हे कुटुंब २७ एप्रिल रोजी कोरोनातून पूर्णपणे बाहेर पडले. कुटुंबातील सर्व सदस्यांची तब्येत ठणठणीत आहे.
विशेष म्हणजे, वयोवृद्ध रामेश्वर दायमा (८५) यांना मधुमेह तर दुर्गा दायमा व रतन दायमा या दोघांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असतानाही या तिघांनी हिमतीने कोरोनाचा सामना करत विजय मिळवला.
अशी होती दिनचर्या : सर्व जण सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायचे, त्यानंतर गरम पाण्याची वाफ घेणे, चहा व दुपारी जेवण व औषध घेणे व आराम करणे, सायंकाळी ४ वाजता फलाहार, त्यानंतर टीव्हीवरील मनोरंजक कार्यक्रम पाहणे, सायंकाळी ६.३० वा. छतावर जाऊन योगासन करणे व रात्री ८:३० वा जेवण, औषध व गरम पाण्याची वाफ घेऊन झोपणे. कोरोना आजारातून बाहेर पडण्यासाठी मी सर्वांचे मनोबल वाढविले. नियमित औषध घेतले व योगासन केले. आहारात पालेभाज्यांचा समावेश करून सकस आहार नियमित घेतला. रक्तदाब व मधुमेहाच्या औषध घेण्यावर विशेषतः लक्ष दिले. -
रामेश्वर दायमा
सर्वांना औषधोपचार वेळेवर देण्याची जबाबदारी मी घेतली होती. ती वेळेवर पार पाडली. याबाबत कोविड सेंटरमधील आरोग्य विभागाशी संपर्क ठेवत होतो. खासगी डॉ. विजेंद्र नागोरी यांचेही मार्गदर्शन मोलाचे राहिले.
-नंदकिशोर दायमा
आम्ही सर्व जण ४ फुटाच्या अंतरावर राहत होतो. मास्क व सॅनिटायझर वापरत होतो. त्यामुळे आमच्यातील हिंमत वाढली. सर्वांना सकस जेवण वेळेवर बनवून देण्याची जबाबदारी पार पाडली. - राखी दायमा
ऑक्सिमीटरच्या सहाय्याने दिवसातून ६ वेळा सर्वांचे ऑक्सिजन लेव्हल तपासून एका वहीत नोंद करीत होतो. प्रत्येकांना त्यांची ऑक्सिजन लेव्हल दाखवत असल्याने उपचाराची दिशा कशी आहे हे प्रत्येकाला समजले. त्यातून आत्मविश्वास वाढत गेला. -
दीपक दायमा