परभणी शहरासह जिल्ह्यातून परदेशामध्ये जाणाऱ्या नागरिकांसह उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या सर्व परदेशी जाणाऱ्या नागरिकांकडून तेथील वाहन चालविण्याचा परवाना काढला जातो. याच परवान्यास आंतरराष्ट्रीय वाहन परवाना म्हटले जाते. हा परवाना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फतही परदेशात जाण्यापूर्वी काढता येतो. त्यासाठी पासपोर्ट, व्हॅलिड व्हिजा, आधार कार्ड ही कागदपत्रे सादर केल्यानंतर एका दिवसात परवाना दिला जातो.
जिल्ह्यात हे परवाना काढण्याचे प्रमाण नगण्य असले तरी २०१९-२० मध्ये केवळ दोनजणांनी, तर २०२०-२१ मध्ये एकाने यासाठी अर्ज केल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. यापुढे हा परवाना नूतनीकरण करण्यासाठी प्रक्रिया सोपी झाली आहे.
असा काढा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना
परदेशात गेल्यानंतर तेथील वाहन चालिवण्यासाठी लागणारा परवाना हा केवळ दुचाकी, तसेच चारचाकी वाहनांसाठी दिला जातो. हा परवाना एकूण १४६ वेगवेगळ्या देशामध्ये चालू शकतो. त्या त्या देशातील यादीनुसार हे लायन्स पासपोर्ट व व्हिजा बघून काढले जाते. ऑफलाईन, तसेच ऑनलाई प्रक्रिया यासाठी राबविली जाते.
कोण काढतो हा
वाहन परवाना
काही कालावधीसाठी शिक्षणाला जाणारे विद्यार्थी, तसेच कायमस्वरूपी नोकरी व वास्तव्यासाठी जाणाऱ्या नागरिकांकडून हा परवाना काढला जातो.
अनेकांना याची माहिती नसल्याने परदेशात गेल्यानंतर तेथील नियमाप्रमाणे वाहन परवाना काढला जातो.
यासाठी आता भारतातील सर्वच राज्यांच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाते.
परदेशात जाणाऱ्या नागरिकांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणे, तसेच नूतनीकरण करणे यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज केल्यानंतर हा परवाना दिला जातो. ऑफलाईन, तसेच ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने एका दिवसाच्या आत हजर राहून प्रक्रिया पूर्ण केली जाते. यामुळे नागरिकांना परदेशात गेल्यावर तेथील वाहन चालविण्याचा परवाना काढण्याची गरज नाही.
-श्रीकृष्ण नकाते,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी