आठ दिवसांत परभणीत ऑक्सिजन प्लांट उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:17 AM2021-04-25T04:17:19+5:302021-04-25T04:17:19+5:30
परभणी : ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता परभणीतील जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटर इमारतीत येत्या आठ दिवसांत ऑक्सिजन प्लांट उभारण्यात ...
परभणी : ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता परभणीतील जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटर इमारतीत येत्या आठ दिवसांत ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. याद्वारे किमान ३०० सिलिंडर भरण्याची सोय उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती नगर विकास, ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्रजक्त तनपुरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
परभणी शहरातील जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटर इमारतीची पाहणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी २४ एप्रिल रोजी सायंकाळी दौऱ्यावर आले असता केली. या पाहणीत त्यांनी ऑक्सिजन प्लांट उभारणीची संबंधित विभाग व जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली. याबाबत त्यांनी जिल्हा कचेरीत पत्रकारांशी संवाद साधला.
तनपुरे म्हणाले, राज्यातील औष्णिक विद्युत प्रकल्पातून ऑक्सिनची निर्मिती करण्याबाबत सध्या नियोजन सुरू आहे. परळी येथील दोन प्लांटमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे पर्यायी प्रकल्पाचे काम अंबाजोगाई व परभणी येथे सुरू करण्यात आले आहे. यासाठी ऊर्जा विभागाच्या महाजेनको कंपनी येथे पुढील आठ दिवसांत २४ तास काम करून रुग्णांसाठी हा प्लांट युद्धपातळीवर उभारण्यासाठी काम करणार आहे. याद्वारे येथील गरज लक्षात घेता ३०० सिलिंडर भरण्याची व्यवस्था होणार आहे. पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, आमदार सुरेश वरपूडकर, राहुल पाटील, बाबाजानी दुर्राणी, राजेश विटेकर यांची उपस्थिती होती.
टँकर पळविल्याची माहिती नाही
परभणी जिल्ह्यासाठीचे ऑक्सिजन टँकर मागील तीन दिवसांपासून इतर जिल्ह्यांनी पळविल्याचा प्रकार घडल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत माझ्याकडे माहिती नाही. एफडीए विभागाचे यावर नियंत्रण आहे. ऑक्सिजनची गरज प्रत्येक जिल्ह्याला आहे, मात्र, असा प्रकार होणे शक्य नाही, असे तनपुरे म्हणाले.
इंजेक्शनची माहिती वेबसाईटवर टाकू
जिल्ह्यात दररोज उपलब्ध असलेला इंजेक्शनचा साठा किती आहे, याची माहिती मिळत नसल्याबाबत राज्यमंत्री तनपुरे यांनी जिल्हा प्रशासनाला ही माहिती लपवू नका, असे आदेश दिले. त्यावर जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी ही माहिती वेबसाईटवर टाकत जाऊ, असे सांगितले.