परभणीकरांच्या रेट्यापुढे नेते नमले; आंचल गोयल यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 08:16 PM2021-08-03T20:16:09+5:302021-08-03T20:23:57+5:30
IAS Aanchal Goel : नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत; जनरेट्याचा विजय झाल्याची भावना परभणीकरांतून व्यक्त होत आहे.
परभणी : आंचल गोयल यांनी ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला असून, गोयल यांच्या नियुक्तीवरून परभणीकरांनी उभारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.
येथील जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी आयएएस अधिकारी असलेल्या आंचल गोयल यांच्या नियुक्तीचे आदेश १३ जुलै रोजी काढण्यात आले. विशेष म्हणजे, परभणी येथे रूजू होण्यासाठी २७ जुलै रोजी आंचल गोयल या परभणी येथे दाखल झाल्या होत्या. त्यामुळे मुगळीकर यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी गोयल यांनी पदभार घेणे अपेक्षित होते. मात्र, नियुक्तीच्या दिवशीच गोयल यांना परत बोलावण्याचे आदेश काढण्यात आले. त्यामुळे गोयल यांनी पदभार स्वीकारला नाही. या सर्व प्रकारानंतर परभणीत तीव्र संतापाच्या भावना व्यक्त झाल्या. समाज माध्यमांतूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
आंचल गोयल परभणीत रूजू होऊ नयेत, यासाठी राजकीय डावपेच रचले गेले आणि त्यांना पदभार घेण्यापासून दूर ठेवण्यात आले. एका महिला अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिली गेली. त्यामुळे परभणीकर नागरिकांनी या निर्णयाविरूद्ध जागरूक नागरिक आघाडीच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने केली होती. या आंदोलनात नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. हा प्रश्न राज्यभर गाजला.
याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा पालकमंत्री नवाब मलिक यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल याच राहतील, असे स्पष्ट केले. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी होकार दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल याच राहणार असल्याचे दुपारीच स्षष्ट झाले होते. त्यामुळे जनरेट्याचा विजय झाल्याची भावना परभणीकरांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान, ३ ऑगस्ट रोजीच नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना पत्र पाठवून परभणी जिल्हाधिकारी पदाचा पदभार दुपारनंतर स्वीकारल्याचे कळविले आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी पदी आंचल गोयल याच राहणार असून, त्या केव्हा रूजू होतात, याकडे लक्ष लागले आहे.
जागरूक नागरिक आघाडीच्या आंदोलनाची दखल
आंचल गोयल यांना पदभार न दिल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी जागरूक नागरिक आघाडीच्या माध्यमातून सोमवारी आंदोलन केले होेते. गोयल यांना सन्मानाने पदभार द्यावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन झाले. आता जिल्हाधिकारीपदी गोयल याच राहणार असल्याने या आंदोलनाला यश आले आहे.