परभणी : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या येथील हजरत सय्यद शहा तुराबूल हक यांच्या ऊरुसाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. सध्या ऊरुसस्थळी जोरदार तयारी सुरु झाली असून उंच राहट पाळणे, मीना बाजार उभारणीचे काम सुरु आहे.
दीडशे वर्षांची परंपरा लाभलेला परभणीतील ऊरुस हर्षोल्हासात साजरा केला जातो. यावर्षी ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान ऊरुस यात्रा भरणार आहे. २ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाने स्थानिक सुटी जाहीर केली असून प्रशासनाच्या वतीने मानाचा संदल काढून उरुसाला प्रत्यक्षात प्रारंभ होतो. जिंतूर रोडवरील दर्गा मैदान परिसरात मीना बाजार आणि राहटपाळणे, मनोरंजनाचे साहित्य दाखल झाले आहेत. उरुसासाठी देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून व्यापारी परभणीत दाखल होतात. एकंदर ऊरुसाची शहरात जोरदार तयारी सुरु झाली आहे.