लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लघु पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या २३ लघुप्रकल्पांपैकी १६ प्रकल्प कोरडेठाक पडल्याने ग्रामीण भागातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना या प्रकल्पांवर अवलंबून असल्याने पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातील येलदरी आणि सेलू तालुक्यातील निम्न दुधना हे दोन मोठे प्रकल्प असून, दोन मध्यम प्रकल्प व २२ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांतील पाणीसाठ्यावरच संपूर्ण उन्हाळ्याची भिस्त असते. मात्र सध्याच्या स्थितीला केवळ निम्न दुधना प्रकल्पातच बºयापैकी पाणीसाठा असून, उर्वरित सर्व प्रकल्प कोरडे पडल्याने पाणी टंचाईची तीव्रता वाढत चालली आहे. लघु पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या २२ लघु प्रकल्पांपैकी निम्मे प्रकल्प सध्या कोरडेठाक पडले असून, उर्वरित प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. हे सर्व प्रकल्प ग्रामीण भागातील आहेत. यापैकी बहुतांश प्रकल्पांवर त्या त्या गावांच्या पाणीपुरवठा योजना चालविल्या जातात. मात्र प्रकल्पच कोरडा पडल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडल्या असून, ग्रामस्थांना शेत शिवारातून पाणी आणावे लागत आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पांपैकी पाथरी तालुक्यातील झरी तलावात ७८.७३ टक्के एवढा सर्वाधिक पाणीसाठा उपलब्ध आहेत. तसेच परभणी तालुक्यातील पेडगावच्या तलावात ७.६० टक्के, मानवत तालुक्यातील आंबेगावच्या तलावात ५.७८ टक्के, गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगावच्या तलावात ६.०८ टक्के, गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी येथील तलावात ७.६६ टक्के, जिंतूर तालुक्यातील कवडा तलावात ९.९३ टक्के, मांडवी तलावात ३.९९ टक्के पाणीसाठा शिल्कल असून, उर्वरित सर्व तलाव कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचे संकट अधिकच गंभीर होत चालले आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.सहा महिन्यांत बदलली परिस्थितीपरभणी जिल्ह्यात येलदरी आणि निम्न दुधना या दोनच प्रकल्पांवर उन्हाळ्यातील पाणीपुरवठ्याची भिस्त असते. सहा महिन्यांमध्ये या दोन्ही प्रकल्पातील पाणी तळाला गेले आहे. निम्न दुधना प्रकल्पात सध्या पाणीसाठा शिल्लक असला तरी तो किती दिवस पुरेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आॅक्टोबर महिन्यात निम्न दुधना प्रकल्पात २९३.५४० दलघमी (७८ टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. सध्या या धरणात १९९.८७० (४० टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. तर येलदरी प्रकल्पामध्ये आॅक्टोबर महिन्यात २२९.६२३ दलघमी (१२ टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. सध्या मात्र या प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठाच शिल्लक राहिलेला नाही. परभणी व पूर्णा शहराला येलदरी प्रकल्पातून पिण्याचे पाणी घेतले जाते. मात्र या प्रकल्पात पाणी नसल्याने सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून दोन्ही शहरांसाठी पाणी आरक्षित करुन घेतले जात आहे.जिल्ह्यातील कोरडे प्रकल्पसोनपेठ तालुक्यातील नखातवाडी, पालम तालुक्यातील तांदूळवाडी, गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी, कोद्री, जिंतूर तालुक्यातील देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा, चिंचोली, आडगाव, केहाळ, भोसी, दहेगाव, गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा, दगडवाडी हे १६ लघू प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्याचप्रमाणे पूर्णा तालुक्यातील राहाटी, कंठेश्वर, जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा हे कोल्हापुरी बंधारे कोरडे पडले आहेत.मासोळी प्रकल्पानेही गाठला तळ४गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पातही पाणीसाठा उपलब्ध नाही. या प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता २७.१४१ दलघमी एवढी असून, सध्या मात्र या प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठाच उपलब्ध नाही. जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पात ५.११४ दलघमी (२०.५४ टक्के) पाणी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ढालेगाव बंधाºयात २१.११ टक्के, मुद्गल बंधाºयात ३७.०६ टक्के, डिग्रस बंधाºयात १५.३७ टक्के आणि गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाºयात १.३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
परभणी :१६ प्रकल्प कोरडेठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:33 AM