परभणी : ७१ हजार मालमत्ता आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:34 AM2020-01-29T00:34:57+5:302020-01-29T00:35:10+5:30
शहरातील मालमत्ता कराच्या वसुुलीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी महानगरपालिकेने आॅनलाईन सॉफ्टवेअर तयार केले असून आतापर्यंत या सॉफ्टवेअरमध्ये ७१ हजार २८७ मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून अजूनही काही हजारांत मालमत्ता वाढण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील मालमत्ता कराच्या वसुुलीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी महानगरपालिकेने आॅनलाईन सॉफ्टवेअर तयार केले असून आतापर्यंत या सॉफ्टवेअरमध्ये ७१ हजार २८७ मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून अजूनही काही हजारांत मालमत्ता वाढण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेला कराच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त होते. यातूनच शहरवासियांना सुविधा दिल्या जातात. परभणी मनपा प्रशासन मालमत्ता कराबरोबरच नळपट्टी वसुली करते. त्याच प्रमाणे शिक्षण कर, वृक्ष कर व या सारख्या इतर करांच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण झाले आहे. परभणी मनपाची आर्थिक स्थिती फारसी चांगली नसल्याने सुविधा पुरविताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. मालमत्ता कराच्या माध्यमातूनच मनपाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते. मात्र शहरातील मालमत्तांचे सर्व्हेक्षण करणे, वाढीव मालमत्तांची नोंद घेणे ही कामे गेल्या काही वर्षापासून रखडली होती. दोन वर्षापूर्वी शहरात मालमत्तांचे सर्व्हेक्षण करण्यात आले तेव्हा मनपाच्या रेकॉर्डवर सुमारे ७० हजार मालमत्तांची नोंद झाली. मात्र त्यापूर्वी बहुतांश मालमत्तांची नोंदच नसल्याने मनपाचे आर्थिक नुकसान होत होते. दोन वर्षापूर्वी मनपाने केलेल्या सर्व्हेक्षणात किमान मालमत्तांची नोंद प्रशासन दफ्तरी झाली. त्यानंतर करातही वाढ करण्यात आली आहे. या सर्व कामांमध्ये आणखी सुसूत्रता आणण्यासाठी आता आॅनलाईन सॉफ्टवेअर विकसित केले जात आहे.
महिनाभरापासून शहरातील मालमत्तांच्या आॅनलाईन नोंदी घेण्याचे काम प्रशासनाने सुरु केले आहे. शहरामध्ये एकूण ६५ वॉर्ड असले तरी प्रशासकीय सोयीसाठी वसुलीकरीता ३५ वॉर्डांची ‘वसुली वॉर्ड’ तयार केले आहेत. या वॉर्डानुसार आॅनलाईन नोंदी घेतल्या जात आहेत. आतापर्यंत ३२ वसुली वॉर्डामधील मालमत्तांच्या नोंदी मनपाच्या दफ्तरी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार ७१ हजार २८७ मालमत्तांचे घर क्रमांक, वॉर्ड क्रमांक, त्या मालमत्तांना लागणारा कर, मालमत्ताधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक आदी नोंदी मनपाच्या संगणकावर घेण्यात आल्या आहेत. साधारणत: १५ ते २० दिवसांमध्ये संपूर्ण शहरातील मालमत्तांचे आॅनलाईन फिडींग होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मोबाईल टॅबच्या सहाय्याने वसुली केली जाणार आहे. त्यासाठी अॅन्ड्रार्इंड अॅप्लीकेशनही विकसित केले असून नागरिकांना घर बसल्या मालमत्ताकरांची माहिती उपलब्ध होणार आहे. शिवाय मालमत्ताकर भरण्यासाठी प्रभाग समिती अ, ब, क आणि मुख्य कार्यालयात स्वतंत्र कक्ष उघडला जाणार असून कुठेही कर भरल्यानंतर संबंधितांच्या मोबाईलवर कर पोहचती झाल्याचा मेसेज मिळणार आहे. त्यामुळे या कामात सुसूत्रता येणार आहे.
६६ कोटी रुपयांची : थकबाकी
४मनपाने आतापर्यंत केलेल्या आॅनलाईन नोंदीमध्ये शहरवासियांकडे ६५ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आणखी काही मालमत्तांच्या नोंदी घेणे बाकी आहे. त्यामुळे थकबाकीचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार दरवर्षी मनपाला नागरिकांकडून २३ कोटी रुपयांची कर वसुली अपेक्षित आहे.
४ या कराच्या दुप्पट म्हणजे ४२ कोटी रुपये नागरिकांकडे थकलेले आहेत. असे एकूण ६५ कोटी ९७ लाख रुपयांची वसुली मनपाला करावी लागणार आहे. सद्यस्थितीला शहरातील १९ वॉर्डामध्ये नागरिकांना त्यांच्या कराच्या रकमेचे बिल वाटप करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन
४मालमत्ताकरांचे अॅन्ड्राईड अॅप्लीकेशन तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सद्यस्थितीला त्यात डाटा फिड केला जात असून या सर्व कामाची पाहणी २७ जानेवारी रोजी आयुक्त रमेश पवार यांनी केली. यावेळी संगणकप्रमुख अदनान कादरी, उपायुक्त गणपत जाधव, नगरसेवक बाळासाहेब बुलबुले यांची उपस्थिती होती. लवकरच या सॉफ्टवेअरचे अधिकृत उद्घाटन करुन शहरवासियांना घर बसल्या मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले.