परभणी : ४१ टक्के पावसाची तूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 11:42 PM2019-08-21T23:42:45+5:302019-08-21T23:43:24+5:30
यंदाच्या पावसाळ्यात पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली असून सर्वसाधारणपणे पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत तब्बल ४१ टक्के पाऊस कमी झाला आहे. परिणामी खरिपातील पिके नाजूक परिस्थितीत असून जिल्हाभरात उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : यंदाच्या पावसाळ्यात पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली असून सर्वसाधारणपणे पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत तब्बल ४१ टक्के पाऊस कमी झाला आहे. परिणामी खरिपातील पिके नाजूक परिस्थितीत असून जिल्हाभरात उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.
परभणी जिल्ह्यात पावसाळी हंगामामध्ये सरासरी ७७४ मि. मी. पाऊस होतो. जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरूवात होते. चार महिन्यांच्या या पावसाळी हंगामातील अडीच महिने संपले असतानाही एकही दमदार पाऊस झाला नाही. १ जून ते २१ आॅगस्ट या काळामध्ये जिल्ह्यात ४७५ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित आहे. त्या तुलनेत आतापर्यंत केवळ २७८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५८.५ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला असून ४१ टक्के पावसाची तूट आजघडीला निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सर्वसाधारणपणे सारखीच परिस्थिती आहे. त्यातही परभणी तालुक्यात ५४ टक्के पाऊस कमी झाला आहे. तर सेलू तालुक्यामध्ये ५२ टक्के पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत पूर्णा तालुक्याची स्थिती काहीसी चांगली आहे. पूर्णा तालुक्यात ४८१ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ३६९.२० मि.मी. पाऊस आजपर्यंत झाला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत ७६.६ टक्के पाऊस झाला असून केवळ २३ टक्के पाऊस या तालुक्यात कमी आहे, असे असले तरी संपूर्ण जिल्ह्यातील पीक परिस्थिती गंभीर आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. येत्या काळात दमदार पाऊस झाला नाही तर हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो की, काय? अशी भिती व्यक्त केली जात आहे.
अडीच महिन्यात ३५.९ टक्के पाऊस
४चार महिन्याच्या पावसाळी हंगामातील अडीच महिने सरले आहेत; परंतु, वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ३५.९ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. परभणी जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७७४.६२ मि.मी. पाऊस होतो. जिल्ह्यात आतापर्यंत २७८ मि.मी. पाऊस झाला आहे.
४वार्षिक सरासरीची तुलना करता केवळ ३५.९ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. त्यामध्ये पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ४५.९ टक्के, गंगाखेड तालुक्यात ४०.३ टक्के, सोनपेठ ३८.५ टक्के, मानवत ३९.८ टक्के, पाथरी ३१.९ टक्के, जिंतूर ३४.९ टक्के आणि सेलू तालुक्यात २८.९ टक्के पाऊस झाला आहे.
सिंचन प्रकल्प कोरडेठाक
४जिल्ह्यात यावर्षी एकही दमदार पाऊस झाला नसल्याने प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येलदरी निम्न दुधना हे दोन्ही मोठे प्रकल्प मृतसाठ्यात आहेत. तर मासोळी, करपरा या मध्यम प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकाही प्रकल्पात पाणीसाठा झाला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्य स्थितीला प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने अनेक नळ योजना बंद आहेत. पुढील काळात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.