लोकमत न्यूज नेटवर्केंसोनपेठ (परभणी ) : येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने प्रधानमंत्री सौभाग्य योजनेंतर्गत तालुक्यातील ४३० घरांना नव्याने वीज जोडणी देण्यात येणार आहे. महावितरण कंपनीने १५ आॅक्टोबरपर्यंत ३७२ घरांना वीज जोडणी दिली आहे. उर्वरित ५८ घरातील वीज जोडणीचे काम प्रगतीपथावर आहे.वीज वितरण कंपनीच्या वतीने शहरातील ३३ के.व्ही. उपकेंद्रांतर्गत ग्रामीण भागात वीजपुरवठा केला जातो; परंतु, आजही अनेक ग्राहकांकडे अधिकृत वीज जोडणी नाही. त्यामुळे वीज चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात तालुक्यात दिसून येते.यावर प्रतिबंध घालण्यासाठी व महाविरणच्या उत्पादनात भर टाकण्यासाठी त्याच बरोबर ग्रामीण सर्वसामान्य कुटुंबाला अधिकृत वीज जोडणी मिळावी, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री सौभाग्य योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत दुर्बल घटकातील कुटुंबांना वीज जोडणी देण्यात येत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील ग्राहकांचे ४३० वीज जोडणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ३७२ कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. उर्वरित ५८ वीज ग्राहकांना वीज जोडणी देण्याचे काम प्रगतीपथावर आहे.जिल्ह्याला ८ हजार ११७ : वीज जोडणीचे उद्दिष्टप्रधानमंत्री सौभाग्य योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यासाठी ४ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध देण्यात आला आहे. त्यामधून ८ हजार ११७ दारिद्रय रेषेखालील ग्राहकांना वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.यासाठी ६ डिसेंबर २०१७ रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. आतापर्यंत ६ हजार ९३१ वीज जोडण्या पूर्ण करण्यात आल्या असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. अजूनही जवळपास १ हजार वीज जोडणी देणे बाकी आहे. त्यामुळे ज्या कंत्राटदाराला या सौभाग्य योजनेंतर्गत कंत्राट मिळाले आहे, त्या कंत्राटदाराने लवकरात लवकर या वीज जोडण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी वीज ग्राहकांमधून केली जात आहे.लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याची गरजवीज वितरण कंपनीच्या वतीने सौभाग्य योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना मोफत वीज जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सोनपेठ तालुक्यात प्रत्यक्ष संबंधित लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे का? याचे महावितरणच्या वतीने सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी सोनपेठ तालुक्यातील लाभार्थ्यांतून होत आहे.
परभणी : ४३० घरे उजळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:00 AM