परभणी @ ८.८ अंश; तापमान घसरल्याने जिल्हा गारठला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 12:00 PM2020-11-09T12:00:28+5:302020-11-09T12:05:55+5:30
हिवाळ्यात तापमानात मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे.
परभणी : हिवाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांतच जिल्ह्याच्या तापमानात लक्षणीय घट झाली असून, सोमवारी ८.८ अंश किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे जिल्हा गारठला असून, गुलाबी थंडीचा अनुभव जिल्हावासिय घेत आहेत.तीन दिवसांपासून तापमानात चढ- उतार होत आहेत.
शुक्रवारी जिल्ह्यात ११ अंश किमान तापमानाची नोंद झाली. त्यानंतर तापमानात किंचतशी वाढ झाली. परंतु सोमवारी पुन्हा पारा घसरला आहे. ८.८ अंश किमान तापमानाची नोंद सोमवारी झाल्याने वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला होता. पहाटे ६ वाजेपासून सुरू होणारे सर्वसाधारण व्यवहार उशिराने सुरू झाले. पहाटेच्या वेळी झोंबणारी थंडी जाणवू लागली. सकाळी ९ वाजेपर्यंत वातावरणात गारवा होता. यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा जमा झाला असून, भूजल पातळीही लक्षणीयरित्या वाढली आहे. ही सर्व परिस्थिती पाहता हिवाळ्यात तापमानात मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. या शक्यतेनुसार हिवाळ्याच्या सुरुवातीच्या काळातच तापमानात मोठी घट झाली आहे.
दरम्यान, वाढलेल्या थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात शेकोट्या पेटविल्या जात आहेत. शेतशिवार आणि गावातील चौकात शेकोटी पेटविल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्याचप्रमाणे पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे.