परभणी : रेकॉर्डवरील आरोपी तलवारीसह जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:55 PM2018-10-16T23:55:04+5:302018-10-16T23:55:45+5:30
पोलिसांनी सुरू केलेल्या रात्रगस्तीमध्ये १५ आॅक्टोबर रोजी रात्री रेकॉर्डवरील एका आरोपीस तलवारीसह ताब्यात घेतले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पोलिसांनी सुरू केलेल्या रात्रगस्तीमध्ये १५ आॅक्टोबर रोजी रात्री रेकॉर्डवरील एका आरोपीस तलवारीसह ताब्यात घेतले आहे़
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने शहरात रात्र गस्त सुरू केली आहे़ शहरातील गौतमनगरातील आरोपी अमोल गायकवाड याच्या ताब्यात तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी एक पथक तयार करून मध्यरात्री छापा टाकला़ तेव्हा अमोल गायकवाड याच्या घराची झडती घेतली असता, पलंगाखाली अडीच फुट लांबीची तलवार मिळून आली़ बेकायदेशीररित्या प्राणघातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपी गायकवाड यास ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याची परभणी येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली़ या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कापुरे यांच्या फिर्यादीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केली़
दोन वर्षांपासून फरार आरोपीस अटक
/>परभणी : पालम तालुक्यातील शेत शिवारातून १३ हजार रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या आरोपीस दोन वर्षानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ पालम येथील खंडू रामराव शेंडगे यांच्या शेत आखाड्यावर २८ जानेवारी २०१६ रोजी चोरी झाली होती़ चोरट्यांनी मंगळसूत्र, चांदीचे वाळे, मोबाईल असा १३ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ पोलिसांना या आरोपीची माहिती मिळाली़ त्या आधारे १६ आॅक्टोबर रोजी गेवराई तालुक्यातील तलवाडा येथून आरोपी मधुकर पंढरीनाथ पवार यास ताब्यात घेतले आहे़ त्याने गुन्हा केल्याची कबुलीही दिली आहे़ या आरोपीला पालम पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे़