परभणी : कृषी विद्यापीठास साडेबारा कोटींचे अतिरिक्त अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:17 AM2020-02-23T00:17:06+5:302020-02-23T00:17:14+5:30
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या थकीत वेतनापोटी १२ कोटी ५० लाख रुपयांचे अतिरिक्त अनुदान राज्य शासनाने उपलब्ध करून दिले आहे़ यासंदर्भातील आदेश नुकतेच काढण्यात आले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या थकीत वेतनापोटी १२ कोटी ५० लाख रुपयांचे अतिरिक्त अनुदान राज्य शासनाने उपलब्ध करून दिले आहे़ यासंदर्भातील आदेश नुकतेच काढण्यात आले आहेत़
डिसेंबरमध्ये झालेल्या अधिवेशनात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत निवृत्ती वेतनधारक व कुटूंब निवृत्ती वेतनधारकांच्या २०१९-२० या वर्षातील थकीत रकमेकरिता १२ कोटी ५० लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती़
या मागणीस शासनाने मंजुरी दिली होती़ त्या अंतर्गत आता राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य विकास विभागाने १२ कोटी ५० लाख रुपयांच्या अतिरिक्त अनुदान वितरणास मंजुरी दिली आहे़ या निधीतून आता निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची थकबाकी दिली जाणार आहे़ शिवाय ज्या काही योजनांतर्गत पदांना मंजुरी आहे, त्या पदांसाठीचे वेतन व भत्ते या बाबींसाठी हा निधी खर्च करता येणार आहे़
एखाद्या योजनेंतर्गत निधी अखर्चित राहिल्यास सदरील अनुदान पुढील महिन्यात वितरित करण्यात येणाऱ्या अनुदानात समायोजित करण्यात यावे़ परस्पर निधी वर्ग करू नये किंवा खर्च करू नये, असा सज्जड इशारा कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे़