लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : संचारबंदीमुळे दारु दुकाने बंद असतानाही अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्या एका आॅटोरिक्षावर पोलिसांनी ११ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास कारवाई केली असून या आॅटोरिक्षासह साडेचार लाख रुपयांचा दारुसाठा पोलिसांनी जप्त केला.जिल्ह्यात अवैधमार्गाने दारु विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी याविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या विशेष पथकाने पालम शहरात या आॅटोरिक्षावर पाळत ठेवली. शहर परिसरात आॅटोरिक्षा थांबवून झडती घेतली असता त्यात मॅकडॉल नंबर १ दारुचे १८० मि.ली. चे १३ बॉक्स, ७५ मि.ली.चे चार बॉक्स, इम्पेरियल ब्ल्यू ७५० मि.ली.चे ५ बॉक्स, ३७५ मि.ली.चे ३ बॉक्स, १८० एम.एल.चे ३८ बाटल्या तसेच दारु विक्रीतून जमा झालेले १ हजार ६५० रुपये असा एकूण ४ लाख ४६ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोेलिसांनी आरोपी विकास मारोती वाघमारे यास ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. त्याच प्रमाणे पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लिंबा येथून सोनपेठकडे जाणाºया एका महिला आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्याकडून २०० लिटर नवसागर, सडके रसायन आणि हातभट्टी दारु असा १० हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाया विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ, हनुमंत कच्छवे, जगदीश रेड्डी, घनसावंत, कांदे, भोरगे, चव्हाण यांच्या पथकाने केल्या.संचारबंदीचे उल्लंघन; गुन्हा दाखल४सोनपेठ: संचारबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात दोन दुचाकीसह एका कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ११ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सिद्धेश्वर माने व बलभीम घोडके हे एम.एच.१४-जीडी ९६०४ या कारने प्रवास करीत होते. तसेच जालिंदर भोंडवे (एम.एम.२३-एजी ९८९२) व शिवाजी नानाभाऊ येडे, तुळशीराम आत्माराम शिंदे (एम.एच.२०-डीएस ९४९७) हे तोंडाला मास्क न बांधता फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्याच प्रमाणे जिल्हा बंदी असतानाही बीड जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असल्याने या पाच जणांविरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.परभणीत दोन दुचाकी जप्त४परभणी: शहरात विनाकारण फिरणाºया दोघांच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ११ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एम.एच.२२ एबी ६०८७ आणि एम.एच.२२ एएम १६२७ या क्रमांकाच्या दोन दुचाकी वरुन दोघे जण पससावतनगर भागात फिरत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी या दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत.मानकेश्वर येथे जुगार अड्ड्यावर धाड४चारठाणा: जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर येथे शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाºया ६ जणांना ताब्यात घेतले आहे. मानकेश्वर येथे सूर्यभान नरसोबा माकोडे यांच्या शेतात तिर्रट नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे छापा टाकला तेव्हा सूर्यभान माकोडे, मधुकर देवराव ढाले, भीमराव रावजी ढाले, रंगनाथ हरिभाऊ तुपसुंदर, कैलास देवराव ढाले आणि फकिरा महादेव ढाले हे सहा जण जुगार खेळत असताना मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडील २ हजार १०० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.झरी येथे बिअरचा साठा जप्तराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ११ एप्रिल रोजी झरी येथे छापा टाकून रमेश शामराव घोतरे याच्या ताब्यातून बिअरचे १४ बॉक्स जप्त केले. या दारुची किंमत ३० हजार ३२३ रुपये एवढी असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. निरीक्षक जी.एल.पुसे, दुय्यम निरीक्षक ए.जी.शिंदे, व्ही.जी.टेकाळे, सी.एन.दहिफळे ही कारवाई केली.
परभणी : अॅटोरिक्षासह साडेचार लाखांचा दारुसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 11:18 PM