परभणी : ‘बेबी केअर किट’ची १० हजार महिलांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:42 AM2020-02-15T00:42:50+5:302020-02-15T00:43:56+5:30
राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने गरोदर मातांना ६० दिवसांत मोफत बेबी केअर कीट देण्याचे आदेश खाजगी एजन्सीला १३ सप्टेंबर रोजी देवूनही अद्याप या कीट जिल्ह्याला प्राप्त झालेल्या नाहीत़ त्यामुळे जिल्ह्यातील १० हजारा गरोदर मातांना या कीटची प्रतीक्षा लागली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने गरोदर मातांना ६० दिवसांत मोफत बेबी केअर कीट देण्याचे आदेश खाजगी एजन्सीला १३ सप्टेंबर रोजी देवूनही अद्याप या कीट जिल्ह्याला प्राप्त झालेल्या नाहीत़ त्यामुळे जिल्ह्यातील १० हजारा गरोदर मातांना या कीटची प्रतीक्षा लागली आहे़
राज्य शासनाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयामध्ये प्रसुत होणाऱ्या सर्व घटकांमधील महिलांना त्यांच्या नवजात बालकांसाठी ‘बेबी केअर कीट’ २०१८-१९ पासून उपलब्ध करून देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने घेतला होता़ यासाठी दरवर्षी १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती़ या बेबी केअर कीटमध्ये १७ वस्तूंचा समावेश आहे़ या बेबी केअर कीट संचाची १ हजार ९९५ रुपये ६३ पैसे किमत निश्चित करण्यात आली होती़ राज्यभर या कीट पुरविण्याचे कंत्राट मुंबई येथील इंडो अलाईड प्रोटीन फुडस् प्रा़लि़ दादर या कंपनीला देण्यात आले होते़ यासाठी राज्यस्तरावरून एकूण ७९ कोटी ९९ लाख ९८ हजार १७६ रुपयांचा निधी देण्यात आला होता़
राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ६० दिवसांत या कीट पुरवठा करण्याचे आदेश् १३ सप्टेंबर २०१९ रोजी देण्यात आले होते़ त्यामुळे जिल्ह्याला १३ नोव्हेंबरपर्यंत या कीट मिळणे अपेक्षित होते़ जवळपास १२० दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप या कीट जिल्ह्याला प्राप्त झालेल्या नाहीत़ जिल्ह्यात प्रशासनस्तरावर जवळपास १० हजार गरोदर मातांची नोंद आहे़
या मातांना या कीट देण्यात येणार होत्या़ १२० दिवसांपासूनही या कीट गरोदर मातांना मिळत नसल्याने शासन निर्णयाविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे़ सदरील कीट गेल्या तरी कुठे? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़
बीडला पुरवठा, परभणी, हिंगोली वेटींगवरच
४महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने बीड जिल्ह्यात या बेबी केअर कीट वितरित करण्यात आल्या आहेत़ परभणी व हिंगोली जिल्ह्यात मात्र या बेबी केअर कीट अद्यापही वितरित करण्यात आलेल्या नाहीत़ उस्मानाबाद जिल्ह्यात नागरी भागात या कीट वितरित करण्यात आल्या आहेत; परंतु, ग्रामीण भागात मात्र त्या वितरित करण्यात आलेल्या नाहीत़ त्यामुळे मराठवाड्यात काही भागांमध्ये या कीटचे वितरण करण्यात सदरील कंत्राटदाराने तत्परता दाखविली तर काही भागांमध्ये पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे कंत्राटदाराची मनमानी पद्धती ही या निमित्ताने समोर आली आहे़ याबाबत राज्यस्तरावरूनच निर्णय झाल्यास सुत्रे हलवू शकतात़
बेबी केअर कीटमध्ये या आहेत १७ वस्तू
शासनाकडून देण्यात येणाºया बेबी केअर कीटमध्ये लहान बाळाचे कपडे, गादी, टॉवेल, डायपर, मसाज आॅईल, थर्मामीटर, मच्छरदाणी, हातमोजे, पायमोजे, सॅनिटायजर, निलकटर, शाम्पू, कंबल, मातेसाठी कपडे व खेळण्या यांचा या कीटमध्ये समावेश आहे़