परभणी : मुख्याध्यापकाच्या कक्षाची मोडतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:46 AM2020-01-28T00:46:59+5:302020-01-28T00:47:15+5:30
येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या कक्षावर दगड मारुन काचा फोडल्याची घटना २६ जानेवारी रोजी रात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
झरी (परभणी): येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या कक्षावर दगड मारुन काचा फोडल्याची घटना २६ जानेवारी रोजी रात्री घडली.
२६ जानेवारी रोजी रात्री झरी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाच्या कक्षावर लोखंडी रॉडच्या सहाय्याने हल्ला करून काचा फोडण्यात आल्या. शाळेच्या सुरक्षा रक्षकाला हा प्रकार लक्षात आला; परंतु, तो पर्यंत अज्ञातांनी तेथून पळ काढला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश मठपती यांनी याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर २७ जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक राहिरे यांनी शाळेला भेट दिली. यावेळी गजानन देशमुख यांचीही उपस्थिती होती. या प्रकरणाचा त्वरित छडा लावू, असे आश्वासन राहिरे यांनी दिले.
दरम्यान, हा प्रकार कोणी व का केला, हे स्पष्ट झाले नसले तरी शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या सांंस्कृतिक कार्यक्रमावरुन ही मोडतोड झाली असावी, अशी चर्चा गावात होत आहे.