परभणी : दुकान बंद ठेवणाऱ्यांचा परवाना रद्द करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 11:46 PM2019-08-21T23:46:28+5:302019-08-21T23:47:38+5:30
सणासुदीचे दिवस जवळ येत असताना मनमानी पद्धतीने १ सप्टेंबरपासून रेशन दुकान बंद ठेवून संपावर जाणाºया दुकानदारांचा परवाना रद्द करून तो बचत गटांना दिला जाईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे यांनी दिला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सणासुदीचे दिवस जवळ येत असताना मनमानी पद्धतीने १ सप्टेंबरपासून रेशन दुकान बंद ठेवून संपावर जाणाºया दुकानदारांचा परवाना रद्द करून तो बचत गटांना दिला जाईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे यांनी दिला आहे़
परभणीसह राज्यातील ९ जिल्ह्यांमधील रेशन दुकानदार विविध मागण्यांसाठी १ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जात असल्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे़ त्या अनुषंगाने जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची व संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची २१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली़
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे यांनी या संदर्भात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी २० आॅगस्ट रोजी पाठविलेल्या पत्रानुसार रेशन दुकानदारांना सूचना दिल्या़ त्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ च्या ३ (१) नुसार सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळविण्यास पात्र लाभार्थी हकदार असतील, असे नमूद करण्यात आले आहे़ त्यामुळे सदरील लाभार्थ्यांना अन्नधान्यापासून वंचित ठेवल्यास अधिनियमातील कलम २३ (१) अन्वये शास्तीची तरतूद आहे़ रास्तभाव दुकानदारांच्या संभाव्य संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणताही लाभार्थी सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळविण्यापासून वंचित राहू नये तसेच रास्तभाव दुकानदाराने अन्नधान्याची उचल न केल्यास अथवा दुकान बंद ठेवल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मधील तरतुदीचा भंग समजण्यात येईल तसेच रास्तभाव दुकानदारांचा परवाना रद्द करून तो बचत गटांना देण्यात येईल, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी पगारे यांनी सांगितले़
जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने शिवाय आगामी काळात सणाचे दिवस असल्याने २३ आॅगस्टपर्यंत चालान भरून रेशन दुकानदारांनी धान्य उचलावे, अन्यथा सदील दुकानदारांविरूद्ध नैसर्गिक आपत्ती अधिनियम २००५ मधील नियम ५३ अन्वये तसेच या अनुषंगाने काही प्रकार घडल्यास आयपीसीमधील तरतुदी अन्वये कारवाई करण्यात येईल, अशी सक्त सूचना यावेळी देण्यात आली़ या बैठकीस सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पल्लवी टेमकर, अव्वल कारकून विजय मोरे, लिपिक रोहित जैस्वाल, रास्तभाव दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप फड आदींची उपस्थिती होती़
परभणी, पालमचे दुकानदार संपातून बाहेर
४१ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असला तरी परभणी व पालम तालुक्यातील रेशन दुकानदार या संपात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले़ राज्यातील काही भागांमधील पूर परिस्थिती, जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य स्थिती व सणासुदीचे दिवस आदी बाबींचा विचार करून जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी संप करू नये, असे आवाहन यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे व सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पल्लवी टेमकर यांनी केले आहे़