परभणी : देश वाचविण्यासाठी एकत्र या- कन्हैय्या कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:38 AM2020-01-29T00:38:57+5:302020-01-29T00:39:33+5:30
सीएए, एनआरसी या कायद्याच्या माध्यमातून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत आहे. तेव्हा देश वाचविण्यासाठी राजकारण सोडून एकत्र यावे, असे आवाहन विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : सीएए, एनआरसी या कायद्याच्या माध्यमातून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत आहे. तेव्हा देश वाचविण्यासाठी राजकारण सोडून एकत्र यावे, असे आवाहन विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांनी केले.
केंद्र शासनाच्या धोरणांच्या विरोधात आ.बाबाजानी दुर्राणी यांनी २८ जानेवारी रोजी पाथरी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर निषेध सभेचे आयोजन केले होते. यावेळी कन्हैय्या कुमार बोलत होते. यावेळी आ.बाबाजानी दुर्राणी मुजाहेद खान, कॉ़ राजन क्षीरसागर, जि़प़चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, मुंजाजी भाले पाटील, सारंगधर महाराज, अनिल नखाते, दादासाहेब टेंगसे, किरण सोनटक्के, नगराध्यक्ष मीना भोरे, पं़स़सभापती कल्पना थोरात, चक्रधर उगले, उपनगराध्यक्ष हन्नानखान दुर्राणी, सुभाष कोल्हे, माधवराव जोगदंड, अशोक गिराम, तबरेज खान दुर्राणी, नगरसेवक हसीब खान, कलीम अन्सारी, युसूफोद्दीन अन्सारी, राजीव पामे, मोईज अन्सारी, राजेश ढगे, अलोक चौधरी यांची मंचावर उपस्थिती होती़
कन्हैय्या कुमार म्हणाले, लोकांना रोजगार पाहिजे आहे. नोकरी मागितली किंवा सुरक्षा मागितली तरी कागद मागितला जात आहे. देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे. अशा परिस्थितीत एनआरसीची काय गरज आहे. एनआरसी, एनपीआर, सीएएच्या माध्यमातून नागरिकता काढून घेण्याचा डाव आखला जात आहे. हा कायदा गरीब हिंदुच्याही विरोधात आहे. तेव्हा या विरोधात विना हिंसा आंदोलन उभे करावयाचे असून, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन कन्हैय्या कुमार यांनी केले.
प्रारंभी प्रास्ताविकात आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी एनआरसी आणि सीएए हे कायदे कशा प्रकारे हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणारे आहेत, हे सांगून मुस्लीम समाजाने या कायद्याच्या विरोधात आंदोलने करावीत; परंतु, ती अहिंसेच्या मार्गाने असावीत, असे सांगितले़ या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते़