परभणी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस दोन वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:51 AM2020-02-05T00:51:31+5:302020-02-05T00:51:56+5:30
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे़ तर त्याच्या साथीदाराला एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली़ ३ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने हा निकाल दिला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे़ तर त्याच्या साथीदाराला एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली़ ३ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने हा निकाल दिला़
या संदर्भात ताडकळस पोलीस ठाण्याने दिलेली माहिती अशी, १९ नोव्हेंबर २०१६ रोजी परभणी तालुक्यातील पिंगळी येथे एक १६ वर्षांची मुलगी बहिणीला शाळेतून आणण्यासाठी जात असताना आरोपी बाळू उर्फ तुकाराम विठ्ठल भुमरे (२१) याने तिच्या पाठीमागे जाऊन विनयभंग केला़
या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात आरोपी बाळू भुमरे व त्याचा त्याचा साथीदार मुंजा उर्फ संजय राजाराम पिसाळ या दोघांविरूद्ध विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंद झाला होता़ तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक डी़एस़ इंगळे, शेख वसीम शेख हरुण यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले़
३ फेब्रुवारी रोजी जिल्हा सत्र न्यायालयासमोर हे प्रकरण चालविण्यात आले़ सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील दराडे यांनी काम पाहिले़ साक्षी पुराव्यांती न्यायालयाने आरोपी बाळू उर्फ तुकाराम भुमरे यास दोन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा तर मुंजा उर्फ संजय राजाराम पिसाळ यास एक महिना सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ या प्रकरणात ताडकळस पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मारोती कुंडगीर यांनी पैरवीसाठी सहकार्य केले़