लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षातील ७ कोटी ७३ लाख १० हजार रुपयांचा ५ आमदारांचा निधी जिल्ह्याला राज्याच्या नियोजन विभागाने शुक्रवारी वितरित केला आहे.आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षाकरीता संपूर्ण निधी लेखा अनुदान स्वरुपात वितरित करण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याच्या नियोजन विभागाने घेतला आहे. त्यानुसार राज्यासाठी ७३४ कोटी रुपयांची रक्कम अर्थसंकल्पीत करण्यात आली होती.त्यामध्ये २८९ विधानसभेचे सदस्य व ७८ विधान परिषदेच्या सदस्यांचा समावेश असून प्रत्येक सदस्याला २ कोटी रुपयांचा निधी प्रतीवर्षी अनुज्ञेय असला तरी त्यांचा या वर्षातील कार्यकाळ लक्षात घेऊन प्रतीमाह १६.६६ लक्ष या प्रमाणे प्रत्येकी १ कोटी १६ लाख ६२ हजार रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.त्यानुसार परभणीचे आ. डॉ. राहुल पाटील, गंगाखेडचे आ.डॉ. मधुसूदन केंद्रे, पाथरीचे आ. मोहन फड व जिंतूरचे आ. विजय भांबळे यांच्यासाठी प्रत्येकी १ कोटी १६ लाख ६२ हजार रुपये या प्रमाणे ४ कोटी ६६ लाख ४८ हजार रुपये वितरित करण्यात आले आहे. तसेच विधानपरिषदेचे सदस्य बाबाजानी दुर्राणी यांच्यासाठी ३ कोटी १६ लाख ६२ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याला एकूण ७ कोटी ७३ लाख १० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून मागील वर्षातील अपूर्ण कामे पूर्ण करावी लागणार आहेत. तसेच नवीन कामेही करावी लागणार आहेत. वितरित केलेल्या निधीचा विनियोग पूर्णपणे होईल, याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही या संदर्भात नियोजन विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
परभणी : आमदार निधीचे ७ कोटी ७३ लाख जिल्ह्याला वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:09 AM