परभणी : जातीवाचक शिवीगाळ; चौघांना ठोठावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:26 PM2020-02-26T23:26:29+5:302020-02-26T23:27:23+5:30
जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी चार आरोपींना न्यायालयाने २६ फेब्रुवारी रोजी प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी चार आरोपींना न्यायालयाने २६ फेब्रुवारी रोजी प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली आहे.
येथील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ मे २०१५ रोजी टँकरचे पाणी भरण्याच्या कारणावरुन वाद झाला होता. घटनेनंतर अनिता गौतम कांबळे यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. आरोपी शेख सलीम शेख पाशूमियाँ, शेख नदीम शेख सलीम, नजीराबी शेख सलीम, शबाना शेख सलीम या चौघांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. तत्कालीन पोलीस उपाधीक्षक दत्तराम राठोड यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायलायात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांच्या समोर सुनावणी झाली. एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी व प्रत्यक्षदर्शीची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी वकील मयूर साळापूरकर यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवीचे काम फौजदार सुरेश चव्हाण, खुणे यांनी केले. या प्रकरणात न्या. देशमुख यांनी चारही आरोपींना वरील प्रमाणे शिक्षा सुनावली.