परभणी : ई-आॅफिसच्या साडेतीन महिन्यांच्या फाईली गहाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:10 PM2019-06-19T23:10:13+5:302019-06-19T23:11:19+5:30
मुंबई येथील मंत्रालयातील ई-आॅफिस प्रणालीच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १ फेब्रुवारी ते २४ मे या कालावधीतील जवळपास १ हजार पेक्षा अधिक फाईल्स गहाळ झाल्या आहेत़ त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या कामाच्या तगाद्यामुळे त्रस्त झाले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मुंबई येथील मंत्रालयातील ई-आॅफिस प्रणालीच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परभणीजिल्हाधिकारी कार्यालयाच्या १ फेब्रुवारी ते २४ मे या कालावधीतील जवळपास १ हजार पेक्षा अधिक फाईल्स गहाळ झाल्या आहेत़ त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या कामाच्या तगाद्यामुळे त्रस्त झाले आहेत़
कामात पारदर्शकपणा व गतीमानता आणण्याच्या उद्देशाने राज्यात काही जिल्ह्यांमध्ये ई-आॅफिस प्रणाली लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता़ ई-आॅफीस प्रणाली अंतर्गत कार्यालय पेपरलेस करून या संदर्भातील फाईल स्कॅन करून डिजीटल सहीच्या माध्यमातून एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर पाठविली जात होती़ त्यामुळे कोणत्या टेबलवर, कोणती फाईल किती दिवसांपासून प्रलंबित आहे, याची इत्यंभूत माहिती कार्यालयप्रमुखांना संगणकाच्या एका क्लिकवर उपलब्ध होत होती़ ही प्रणाली पारदर्शक असल्याने जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ही प्रणाली लागू करण्यासाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला़ ई-आॅफीस प्रणाली लागू करण्यासंदर्भातील तांत्रिक बाबींची कमतरता असताना व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही मिळाले नसताना विशेष बाब म्हणून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयास यासाठी परवानगी देण्यात आली़ त्यानुसार १ फेब्रुवारी २०१९ पासून जिल्हाधिकारी कार्यालयात ई-आॅफीस प्रणाली सुरू करण्यात आली़ त्यानंतर आलेली प्रत्येक फाईल स्कॅन करून ती डिजीटल स्वाक्षरीच्या माध्यमातून संबंधित टेबलवरून जबाबदार अधिकाºयांमार्फत पूर्ण होऊ लागली़ जवळपास २४ मेपर्यंत ही प्रक्रिया सुरळीत होती़ २४ मे रोजी अचानक मुंबईतील मंत्रालयातील ई-आॅफीस प्रणालीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला व ई-आॅफीसची संपूर्ण प्रक्रिया बंद पडली़ त्यामुळे परभणीसह औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी जिल्ह्यांमधील ई-आॅफीसचे कामकाज ठप्प झाले़ १५ जून रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास बºयाच प्रयत्नानंतर मुंबईतून ई-आॅफीस प्रणाली पूर्ववत झाली़ त्यानंतर एका फाईलवरून दुसरी फाईल पाठविली जाऊ लागली; परंतु, जुन्या प्रकरणातील फाईल्स व या संदर्भातील डाटा दिसेनासा झाला़ गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात जुना डाटा रिकव्हर करण्यासाठी प्रयत्न होत आहेत़
यासाठी मुंबईतील मुख्य सर्व्हरच्या ठिकाणी एनआयसीमार्फत संपर्क साधण्यात येत आहे; परंतु, जुना डाटा रिकव्हरच होत नाही़ त्यामुळे १ फेब्रुवारी ते २४ मेपर्यंतच्या १ हजारापेक्षा अधिक फाईल्स गहाळ झाल्या आहेत़ अशातच आता लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी व त्यानंतरच्या प्रकरणातील फाईल्सवर काय निर्णय झाले? यासाठीचा पाठपुरावा संबंधित गावातील लोकप्रतिनिधी, नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करू लागले आहेत़ अशा नागरिकांना किंवा लोकप्रतिनिधींना या संदर्भात उत्तरे देताना अधिकारी व कर्मचाºयांच्या नाकी नऊ येत आहेत़ यातून वादावादीचे प्रकार घडत आहेत़ १९ जून रोजीही जिल्हाधिकारी कार्यालयात असाच प्रकार घडला़ त्यामुळे काय करावे? असा प्रश्न अधिकारी व कर्मचाºयांसमोर उपस्थित झाला आहे़
विविध विभागांच्या कामकाजावर होतोय परिणाम
च्जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-आॅफीस प्रणालीचे कामकाज १५ जून रोजी सायंकाळी ६ नंतर पूर्ववत झाले़ त्यानंतर गेल्या १७ जूनपासून ई-आॅफीस प्रणाली अंतर्गत कामकाज सुरू आहे़
च्असे असले तरी १ फेब्रुवारी ते २४ मेपर्यंतच्या जुन्या फाईल्स कोणाच्या टेबलवर प्रलंबित आहेत, हेच कळेनासे झाले आहे़ त्यामुळे या फाईल्सवरील कारवाईबाबत विचारणा करण्यासाठी नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहेत़
च्यावेळी या नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकारी- कर्मचारी हतबल होत आहेत़ यातून वादा-वादीचे प्रकार घडत आहेत़ परिणामी दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम दिसून येत आहे़
मुंबईहून सुरळीत होण्याचाच सातत्याने मिळतोय निरोप
जिल्हा कचेरीतील जिल्हा सूचना अधिकारी सुनील पोटेकर यांच्यापर्यंत सोमवारी जिंतूर तालुक्यातील एक प्रकरण गेले़ यावेळी त्यांनी मुंबई येथील प्रमुख कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांना लवकरच जुना डाटा रिकव्हर करून दिला जाईल, असे सांगण्यात आले़ प्रत्यक्षात दिवसभर तसे घडलेच नाही़