लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आरोग्य सुविधेत भर घालण्यासाठी १०० खाटांचे स्त्री रुग्णालय मंजूर झाले असले तरी भविष्यातील गरज लक्षात घेऊन तीनशे खाटांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करु, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १०० खाटांच्या स्त्री रुग्णालय आणि डीईआयसीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. शासकीय रुग्णालयासाठी रुग्णसेवेचा दर्जा उत्तम असल्याने गोरगरीब रुग्ण या रुग्णालयात येण्याचे प्रमाण जास्त असते. शासनाचाही अशा रुग्णालयातील सुविधा वाढविण्यावर भर आहे, असे सांगून डायलेसीस यंत्र सामुग्रीसाठी सिद्धीविनायक ट्रस्टकडे मागणी नोंदविण्यात येईल, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमास खा. बंडू जाधव, आ.डॉ.राहुल पाटील, जि.प. अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, महापौर मीनाताई वरपूडकर, जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, सीईओ बी.पी. पृथ्वीराज, मनपा आयुक्त रमेश पवार, सखुबाई लटपटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी स्त्री रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागेचा प्रश्न सोडविला असून या इमारतीचे लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करु, असे सांगितले. खा.बंडू जाधव, आ.डॉ.राहुल पाटील, मीनाताई वरपूडकर यांचीही भाषणे झाली. डॉ.काजी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास शहरातील मान्यवर, पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होेते. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.खंदारे यांनी आभार मानले.
परभणी : ३०० खाटांच्या रुग्णालयासाठी पाठपुरावा करु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:45 AM