परभणी : पाणी, स्वच्छतेच्या प्रश्नावर गाजली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 12:06 AM2018-11-04T00:06:57+5:302018-11-04T00:08:53+5:30

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीतही दिसून आला़ शनिवारी पार पडलेल्या बैठकीत पाणी प्रश्नाबरोबरच स्वच्छतेच्या प्रश्नावर नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित करून पाणी पुरवठ्याची तरतूद करण्याची मागणी केली़

Parbhani: Gajali Sabha on the question of water, sanitation | परभणी : पाणी, स्वच्छतेच्या प्रश्नावर गाजली सभा

परभणी : पाणी, स्वच्छतेच्या प्रश्नावर गाजली सभा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीतही दिसून आला़ शनिवारी पार पडलेल्या बैठकीत पाणी प्रश्नाबरोबरच स्वच्छतेच्या प्रश्नावर नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित करून पाणी पुरवठ्याची तरतूद करण्याची मागणी केली़
येथील बी़ रघुनाथ सभागृहात ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्थायी समितीचे सभापती सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सभेला प्रारंभ झाला़ यावेळी आयुक्त रमेख पवार, प्रभारी नगरसचिव विकास रत्नपारखे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती़ प्रारंभी निलाबाई भास्करराव देशमुख, कवि जरताज हाश्मी, मनपाचे कर्मचारी के़बी़ हैबत्ते यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ नगरसेविका स़समरीन बेगम फारुख यांनी प्रभाग क्रमांक १६ मधील पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला़ या प्रभागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, टँकर सुरू करण्याची मागणी त्यांनी केली़ वारंवार मागणी करूनही टँकर सुरू होत नसल्याने नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले़ त्यावर सभापती सुनील देशमुख यांनी पाण्याचे टँकर सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले़
नगरसेविका डॉ़ विद्या पाटील यांनीही खानापूर, सिद्धीविनायकनगर, आरोग्य कॉलनी, मातोश्रीनगर, विश्वजीवन सोसायटी, क्रांतीनगर या भागात जलवाहिनी नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ तेव्हा टँकर सुरू करण्याची मागणी पाटील यांनी केली़ त्यामुळे सभेत पाणीप्रश्न चांगलाच गाजला़ तसेच स्वच्छतेच्या प्रश्नावरही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले़ प्रभाग क्रमांक १५ मध्ये नियमित साफसफाई होत नाही, असे नगरसेविका पाटील यांनी सांगितले तर नगरसेवक एस़एम़ अली पाशा, गुलमीर खान, नाजनीन शेख शकील यांनीही नियमित स्वच्छता होत नसल्याचे सभागृहासमोर सांगितले़ नगरसेवक इम्रान हुसैनी यांनी आॅगस्टमध्ये प्रभागातील स्वच्छतेसाठी जेसीबीची मागणी केली होती़ अद्यापपर्यंत जेसीबी मिळाला नाही़ एवढे दुर्लक्ष का? असा सवाल केला असता अधिकारी निरुत्तर झाले़ शौचालयांच्या झालेल्या दुरवस्थेविषयी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली़ त्यावर सार्वजनिक शौचालय स्वच्छ ठेवा आणि त्याचा दररोज अहवाल द्यावा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या़ या सभेत शहरी आरोग्य अभियानांतर्गत शंकरनगर येथील स्थलांतरित व धाररोडवरील प्रस्तावित नागरी आरोग्य केंद्राच्या बांधकामास परवानगी देण्यात आली़ महापालिकेसाठी विधी अधिकारी म्हणून वकिलाची नियुक्ती करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला़ सभेमध्ये नगरसेवक इम्रान लाला, एस़एम़ अली पाशा, गुलमीर खान, गणेश देशमुख, आदींनी चर्चेत सहभाग नोंदविला़
परभणीतील सर्व मोबाईल टॉवर अनधिकृत
४शहरातील मोबाईल टॉवरचा विषय या सभेत चर्चेत आला़ मोबाईल टॉवर संदर्भात खाजगी एजन्सीमार्फत सर्वेक्षण करण्याच्या ठरावावर चर्चा झाली़ यावर शहरात एकूण टॉवर किती आहेत आणि महापालिकेला टॉवरच्या माध्यमातून किती उत्पन्न मिळते, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला़ त्यावर मनपाचे सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख यांनी शहरातील टॉवरची माहिती दिली़ शहरात एकूण ११५ मोबाईल टॉवर आहेत़ त्यातील साधारणत: ९ टॉवर बंद असून, उर्वरित सर्वच्या सर्व टॉवर अनधिकृत असल्याचे त्यांनी सांगितले़ या टॉवरधारकांकडून प्रत्येक वर्षी ३० हजार रुपयांच्या वसुलीची मागणी महापालिका करीत आहे़ टॉवरच्या सर्वेक्षण आणि वसुलीसाठी एजन्सी नेमण्याचा ठराव आहे़ मनपाला अपेक्षित उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न एजन्सीकडून मिळाले तर एजन्सीची नियुक्ती करण्यासंदर्भातही चर्चा झाली़ विशेषत: एका टॉवर विविध पाच ते सहा कंपन्यांचे कामकाज चालते़ त्यामुळे एजन्सीमार्फत सर्वे करून घ्यावा, असे नगरसेवक इम्रान हुसेन यांनी सांगितले़ या ठरावावर पुढील बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे़
नगरसेविकेचे आंदोलन
प्रभाग क्रमांक १६ मधील नगरसेविका समरीन बेगम स़ फारूख यांनी त्यांच्या प्रभागात टँकर सुरू करण्याच्या मागणीसाठी खाली बसून आंदोलन केले़ साखला प्लॉट भागात जलवाहिनी नसल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, वारंवार मागणी करूनही टँकर मिळत नसल्याने त्यांनी हे आंदोलन केले़ त्याचप्रमाणे उड्डाणपुलाच्या परिसरात गायरान जमिनीवर असलेले अतिक्रमण आदेश देऊनही काढले नाही़ तसेच गंगाखेड नाक्यावरील पेट्रोल पंपधारकाने केलेले अतिक्रमणही काढण्यात आले नाही़ या तिन्ही प्रश्नावर समरीन बेगम यांनी हे आंदोलन केले़ त्यावर सभापती सुनील देशमुख व आयुक्त रमेश पवार यांनी आश्वासन दिल्यानंतर अर्ध्या तासाने आंदोलन मागे घेण्यात आले़

Web Title: Parbhani: Gajali Sabha on the question of water, sanitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.