काम पूर्ण होण्याआधीच परभणी- गंगाखेड सिमेंट रस्त्याला तडे... !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 06:45 PM2020-11-04T18:45:24+5:302020-11-04T18:46:49+5:30
परभणी ते गंगाखेड या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न राज्यभर गाजला होता.
गंगाखेड : परभणी- गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच या रस्त्याला तडे गेल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता किती काळ टिकेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
परभणी ते गंगाखेड या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न राज्यभर गाजला होता. अनेक आंदोलने केल्यानंतर या रस्त्याच्या निर्मितीचा प्रश्न मार्गी लागला. शासनाने या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन रस्ता निर्मितीला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात रस्ता कामासाठी २०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. वर्षभरापूर्वी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून, एका बाजूचे सिमेंट काँक्रेटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी हे काम करीत असताना दर्जा राखला गेला नाही. परिणामी रस्त्याला अनेक भागात तडे गेले आहेत.
गंगाखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या महातपुरी पाटी ते दुसलगाव पाटी या रस्त्यावर जागोजागी भेगा पडल्या आहेत. लांब अंतरापर्यंत असलेल्या या भेगांमुळे हा रस्ता किती काळ टिकेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. मात्र त्यापूर्वीच रस्ताला तडे गेल्याने वाहनधाकांतून संताप व्यक्त केला जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दबाई करताना काळ्या मातीचा वापर
या रस्त्याचे काम करण्यासाठी कंत्राटदाराने अनेक भागात मुरुमाऐवजी काळ्या मातीचा वापर केला. सिमेंट रस्त्याच्या खालचा थर मुरुम टाकून दबाई करुन घेणे आवश्यक होते. मात्र सर्रास काळी माती मिश्रित मुरुमाचा वापर करण्यात आला. त्यावर सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले. त्यामुळे पावसाचे पाणी मातीत मुरले जात असून, रस्त्याला तडे पडले आहेत. याच भागात काही ठिकाणी तर सिमेंट काँक्रीट रस्त्याचा वरील भाग चक्क उखडून गेला आहे. काही ठिकाणी मोठे खड्डेही पडले आहेत. किमान रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर काही वर्षे तरी हा रस्ता चांगला राहील, ही वाहनधारकांची अपेक्षा फोल ठरली आहे.