अन्वर लिंबेकर।लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : शेतकºयांच्या शेतमालाची कवडीमोल दराने खरेदी केली जात आहे. तूर, कापसाला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असताना हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्याऐवजी सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी शनिवारी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केली.राष्ट्रवादीच्या वतीने मराठवाडाभर हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत शनिवारी गंगाखेड येथे हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यानिमित्त आयोजित जाहीर सभेत अजीत पवार बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, राज्य प्रवक्ते नवाब मलीक, चित्रा वाघ, माजीमंत्री अनिल देशमुख, आ.सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ.विजय भांबळे, जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, आयोजक आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, माजी खा.सुरेश जाधव, संग्राम कोते पाटील, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, माजी आ.ज्ञानोबा गायकवाड, माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, अजय चौधरी, प्रल्हाद मुरकुटे, मारोतराव बनसोडे, विठ्ठल सूर्यवंशी, सुरेश भुमरे, शंकरराव मोरे, साहेबराव भोसले, राजेभाऊ सातपुते, बबनराव शिंदे, शंकर वाघमारे, लिंबाजी देवकते, हाजी कुरेशी, माधवराव भोसले, शहाजी देसाई, रत्नाकर शिंदे, अशोक बोखारे, डॉ.खाजा खान, वसंत सिरस्कर, सय्यद अकबर, सुनील चौधरी, गिरीश सोळंके, अखिल अहेमद आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना अजीत पवार म्हणाले की, परभणी जिल्ह्यात दरवर्षी १२०० ते १५०० कोटी रुपयांचा कापूस पिकविला जातो. परंतु, त्याला योग्य भाव मिळत नाही. कवडीमोल दराने शेतकºयांचा शेतमाल खरेदी केला जातो. त्यांना हमीभाव दिला जात नाही, हे आम्ही नव्हे तर वृत्तपत्र सांगत आहेत, असे सांगून त्यांनी ‘लोकमत’ने २० जानेवारीच्या अंकामध्ये प्रसिद्ध केलेली ‘कवडीमोल दराने शेतकºयांची तूर खरेदी’ ही बातमी उपस्थितांना दाखविली. शेतकरी संकटात असल्याने जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरु करणे आवश्यक असताना ते का सुरु केले जात नाहीत, असा सवाल करुन सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या साडेतीन वर्षात जिल्ह्यात कोणता मोठा सिंचन प्रकल्प आला ते सांगा? पूर्वी मंजूर झालेल्या जायकवाडीच्या कालव्यांचे काम तरी या सरकारने पूर्ण केले आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. राज्यात शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या असताना भाजपा-शिवसेना सरकार त्याविषयी का बोलत नाही? असा सवाल करीत त्यांनी सरकारने पाण्याचे दर वाढविले आहेत, शेतकºयांची वीज जोडणी तोडली जात आहे, त्यांना रोहित्र दिल्या जात नाही. राष्ट्रवादीने संघर्ष यात्रा काढली. त्यामुळेच राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली. कापसावरील बोंडअळीचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला, त्यामुळे शेतकºयांना अनुदान जाहीर केले. मागितले तरच मिळते. त्यामुळे आता गप्प बसायचे नाही, असे सांगत त्यांनी शेतकºयांचा वीज पुरवठा तोडू नका, असा इशाराही दिला.यावेळी बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, जाहिरातीमध्ये शेतकºयांना दाखवून सरकारकडून शेतकºयांचा अपमान केला जात आहे. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारची कर्जमाफी फसवी आहे. ‘बडे मियाँ (नरेंद्र मोदी) व छोटे मियाँ (देवेंद्र फडणवीस)’ हे खोटे बोलण्यात पटाईत झाले आहेत. त्यांनी फसवेगिरीच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, असेही ते म्हणाले. ३१ जानेवारीपर्यंत बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या अन्यथा शेतकरी हातामध्ये रुमणं घेतील, मग तुम्हाला पळताभूई थोडी होईल, असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला. यावेळी चित्रा वाघ, नवाब मलीक, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, आ.बाबाजानी दुर्राणी यांचेही भाषणे झाली. यावेळी श्रीकांत भोसले यांच्यासह त्यांच्या मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रास्ताविक मिथिलेश केंद्रे यांनी, सूत्रसंचालन डॉ.देविदास चव्हाण, पदूदेवी जोशी यांनी तर आभार सदाशीव भोसले यांनी मानले. यावेळी २५ मागण्यांचे निवेदन गंगाखेडच्या उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आले.रत्नाकर गुट्टे यांच्यावर जोरदार टीकाया सभेत आ.मधुसूदन केंद्रे, नवाब मलिक, मिथिलेश केंद्रे यांनी रासपचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना मिथिलेश केंद्रे म्हणाले की, गुट्टे यांनी शेतकºयांना फसवून त्यांच्या नावाने कर्ज घेतले, त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हाही दाखल झाला आहे. परंतु, त्यांना अद्याप अटक झालेली नाही. न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास आहे, सांगून त्यांनी गुट्टे हे त्यांच्या नावासमोर डॉक्टर ही पदवी लावतात, ही पदवी त्यांना कोठून मिळाली, ते कशात डॉक्टर झाले, एक वेळ त्यांनी यावर जाहीरपणे सांगावे, असेही मिथिलेश केंद्रे म्हणाले. आ. मधुसूदन केंद्रे यावेळी म्हणाले की, जवळपास ५०० कोटी रुपयांचे शेतकºयांच्या नावे कर्ज घेऊन त्यांना फसविण्यात आले. फसविणाºयांचे नाव या सभेत घेणार नाही. न्यायालयात याबाबत खटला सुरु आहे. न्यायालय या संदर्भात जो निकाल देईल तो आम्हाला मान्य राहील. परंतु, शेतकºयांची फसवणूक करणाºयांना आम्ही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी नवाब मलिक यांनीही गुट्टे यांच्यावर टीका करीत त्यांनी शेतकºयांची फसवणूक केल्याचा आरोप केला.
परभणी :हमीभावाबाबत सरकारची बघ्याची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:26 AM