परभणी : विनयभंग प्रकरणात आरोपींना कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:29 PM2020-02-26T23:29:43+5:302020-02-26T23:30:24+5:30
पाठलाग करुन शेरेबाजी करीत मुलीचा विनयभंग करणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांना जिल्हा न्यायालयाने २५ फेब्रुवारी रोजी कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पाठलाग करुन शेरेबाजी करीत मुलीचा विनयभंग करणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांना जिल्हा न्यायालयाने २५ फेब्रुवारी रोजी कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणाची माहिती अशी, मोटारसायकलवरुन पाठलाग करीत शेरेबाजी केल्या प्रकरणी पीडित मुलीने नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन मंगेश राजू गायकवाड, विक्की विष्णू भिसे व गणेश अंकुशराव मुरमुरे या तिघांविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला होता. पोलीस उपनिरीक्षक जाधवर यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी अभियोक्ता मयूर साळापूरकर यांनी बाजू मांडली. त्यानंतर अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एम.पाटील यांनी आरोपी मंगेश गायकवाड यास कलम १२ पोक्सो अन्वये सहा महिने सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि कलम ५०६ भादंविनुसार तीन महिने कारावास व १ हजार रुपये दंड सुनावला. त्याच प्रमाणे विक्की विष्णू भिसे व गणेश अंकुशराव मुरमुरे यांना प्रत्येकी ६ महिने कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात कोर्ट पैरवी कर्मचारी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनाजी गायकवाड यांनी काम पाहिले.
सरकारी कामात अडथळा: आरोपीस कोर्ट उठेपर्यंत शिक्षा
४परभणी- सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरुन एका आरोपीस कोर्ट उठेपर्यत शिक्षा आणि चार हजार रुपयांचा दंड न्यायालयाने सुनावला आहे. या संदर्भात न्यायालयीन सूत्रांनी दिलेली माहिती अशी, पार्डी येथील आरोपी अविनाश राठोड हा त्याच्या भावाच्या जात प्रमाणपत्राची चौकशी करण्यासाठी १९ नोव्हेंबर २०१४ रोजी सेलू येथील उपविभागीय कार्यालयात आला होता. यावेळी लिपीक त्र्यंबक बहुरे यांच्याशी हुज्जत घालून त्यांच्याजवळील संचिका हिसकावून घेत फाडून टाकली. बहुरे यांच्या सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हे प्रकरण पाचवे जिल्हा व सत्र न्यायाधीश शेख अकबर यांच्या न्यायालयासमोर चालले. सरकार पक्षातर्फे आनंद गिराम यांनी बाजू मांडली. साक्षी पुराव्याअंती न्या. शेख अकबर यांनी आरोपी अविनाश राठोड यास कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व चार हजार रुपयांचा दंड सुनावला. कोर्ट पैरवी म्हणून वंदना आदोडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण यांनी काम पाहिले.