परभणी : आवक वाढल्याने पालेभाज्यांचे भाव कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:18 AM2020-02-23T00:18:23+5:302020-02-23T00:19:18+5:30
जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाल्याने पालेभाज्यांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. परिणामी त्यांचे भाव कोसळले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाल्याने पालेभाज्यांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. परिणामी त्यांचे भाव कोसळले आहेत.
परभणी जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे जलसाठे तुडुंब भरले होते. त्यामुळे अनेक वर्षापासून येलदरी व जायकवाडी सारखी मोठी धरणे शंभर टक्के भरली. त्यामुळे पाणीपातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जिल्ह्यातील ८६ जलसाठ्यांचे निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये ३.६५ मीटरने पाणीपातळी वाढल्याची भूजल सर्व्हेक्षण विभागाकडे नोंद आहे. पाणीपातळी वाढल्याने विहीर व बोअरला पाणीही मुबलक उपलब्ध आहे.
त्यामुुळे या पाण्यावर भाजीपाल्याची पिके घेण्याचे प्रमाणही जिल्ह्यात वाढले आहे. काही दिवसांमध्येच ही पिके हातात येत असल्याने व त्यांना यापूर्वी चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना यावर्षीही भाजीपाल्याला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, त्यांचीही अपेक्षा फोल ठरताना दिसून येत आहे. परभणी येथील शनिवारच्या बाजारात या पालेभाज्यांच्या दरांचा आढावा घेतला असता शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटाची जाणीव होऊ लागली आहे.
काही दिवसांपूर्वीच शंभर रुपयांपेक्षा अधिक प्रतिकिलो रूपये दराने विकला जाणारा कांदा शनिवार बाजारात २० रुपये प्रतिकिलोने विकला जात होता. बटाटेही २० रुपये किलोनेच तर टोमॅटो ७ रुपये प्रतिकिलोने, कोथिंबीर फक्त १५ रुपये प्रतिकिलोने विकली जात होती. आद्रक ५० रुपये प्रतिकिलो तर वांगे २० रुपये , भेंडी ३० रुपये, फूलकोबी व पत्ताकोबी प्रतिकिलो १५ रुपये, शिमला मिरची ३० रुपये, काकडी १२ रुपये, लिंबू ३० रुपये, गाजर १५ रुपये, वालाच्या शेंगा २० रुपये, मेथी ५ रुपये प्रति जुडी, पालक १५ रुपये जुडी, कांदापात २० रुपये जुडी, शेपू १५ रुपये प्रति जुडी दराने विकली जात होती. मुळा १० रुपयास एक, शेवगा, गवार प्रतिकिलो ६० रुपये तर चवळीची शेंग ४० रुपये प्रतिकिलोे, कारले ४० रुपये प्रतिकिलो, कद्दू प्रति नग १० रुपये या दराने विक्री केला जात असल्याचे पहावयास मिळाले. एकीकडे पालेभाज्यांचे भाव कोसळले असताना खरेदीदारांची फारशी गर्दी दिसून येत नव्हती. त्यामुळे ग्रामीण भागातून थेट बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेतकºयांच्या चेहºयावर निराशेची भावना दिसून येत होती.
यावर्षी पहिल्यांदाच चांगले पाणी उपलब्ध झाल्याने मोठ्या अपेक्षेने शेतात पालेभाज्यांची लागवड केली होती. यासाठी मेहनतही अधिक घेतली होती. आता बाजारात माल विक्रीला आणल्यानंतर भाव मिळत नाही. त्यामुळे या मालाच्या विक्रीतून मिळणाºया पैशावर संसाराचे केलेले नियोजन फिसकटले आहे. त्यामुळे आमच्यावर नेहमीप्रमाणे संकटाची छाया गडद झाली आहे.
-संतोष इक्कर,
भाजीपाला विक्रेता