परभणी : ३६ लाखांचा अपहार; चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:40 AM2020-01-29T00:40:58+5:302020-01-29T00:41:21+5:30
श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट को-आॅप क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या ३६ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणात चेअरमनसह इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट को-आॅप क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या ३६ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणात चेअरमनसह इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
तालुक्यातील पिंपरी देशमुख येथील चंद्रकांत बाबासाहेब देशमुख यांनी ८ आॅगस्ट २०१८ रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानुसार श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट को-आॅप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन व पदाधिकाऱ्यांनी ३६ लाख रुपयांचा अपहार करून सोसायटी बंद केली. सोसायटीचे चेअरमन सतीश पोपटराव काळे, तत्कालीन क्षेत्रीय अधिकारी अशोक शाहूराव राठोड, शाखाधिकारी सुनील मधुकरराव मुळे आणि रोखपाल संतोष विश्वनाथ आडे या चौघांविरुद्ध नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. दीड वर्षांपासून आरोपी फरार होते. या गुन्ह्याचा तपास करणाºया आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने १४ जानेवारी रोजी अशोक राठोड यास पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथून ताब्यात घेतले. १५ जानेवारी रोजी रोखपाल संतोष आडे याला बीड जिल्ह्यातील तिगाव तांडा (ता.वडवणी) येथून ताब्यात घेतले. तसेच आरोपी सुनील मधुकरराव मुळे यास २६ जानेवारी रोजी माजलगाव येथून ताब्यात घेतले. या सोसायटीचे चेअरमन सतीश पोपटराव काळे हा इतर गुन्ह्यात नाशिक कारागृहात होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सध्या सतीश काळे, अशोक राठोड आणि संतोष आडे हे न्यायालयीन कोठडीमध्ये असून, सुनील मुळे हा ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सखोल माहिती घेतली जात आहे. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक रागसुधा, सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद दळवी, बाबासाहेब लोखंडे, बाबुराव कराळे, संजय वळसे, पंडित खरडे, अमोल वाडेकर, देवानंद भालेराव, सायबर सेलचे बालाजी रेड्डी व राजेश आगाशे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.