लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): तालुक्यातील सिरसम (शे.) येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला तडे गेल्याने या धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे. या इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.तालुक्यातील सिरसम शे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीत असलेल्या चार वर्गखोल्या व कार्यालयाच्या भिंतीला तडे गेले असून, मोडकळीस आलेल्या व धोकादायक स्थितीतील इमातीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे.जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. ही इमारत कोसळून विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी १५ डिसेंबर २०१८ रोजी सरपंच ओमकेश केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत शाळेच्या नवीन बांधकामाबाबतचा ठराव पारित करण्यात आला. त्याचबरोबर २३ जानेवारी २०१९ रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमान भालेराव व इतर सदस्यांनीही या शाळेला नवीन इमारत देण्याचा ठराव घेतला.२५ जानेवारी २०१९ रोजी गटविकास अधिकारी, जि.प. बांधकाम उपविभागाचे उपअभियंता, प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या पथकाने शाळेला भेट देऊन पाहणी केली. यानंतर शाळेची इमारत धोकादायक असल्याची नोंद करून इमारतीची दुुरुस्ती केल्यानंतर ही इमारत वापरणे शक्य नसल्याने इमारत जमीनदोस्त करून या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला; परंतु, पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरी शिक्षण विभागाने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे धोकादायक इमारतीत बसून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे.जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सिरसम ग्रामस्थांतून होत आहे.प्रस्ताव: धूळ खात४१९८८ साली बांधकाम झालेल्या सिरसम शे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ४ खोल्या व एक कार्यालय अशा ५ खोल्या बांधण्यात आल्या होत्या. या इमारतीला तडे गेल्याने ही इमारत कधीही कोसळून दुर्घटना घडू शकते. या शाळेची पाहणी करून ५ फेब्रुवारी २०१९ रोजी संयुक्त तपासणी अहवाल, तपासणी सूची, ग्रा.पं. ठराव, शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव, इमारतीचे फोटो, अंदाजपत्रक आदी कागदपत्रे जोडून हा प्रस्ताव जि.प.चे कार्यकारी अभियंता यांच्याकडे सादर केलेला आहे; परंतु, चार महिन्यांचा कालावधी उलटूनही हा प्रस्ताव धूळ खात पडून असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
परभणी : धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:24 AM