लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यात दुष्काळी तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु, शासकीय स्तरावर अजूनही दुष्काळ निवारण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे कामे ठप्प पडली आहेत. हाताला काम नसल्याने मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे.पालम तालुक्यात ६६ ग्रामपंचायतींतर्गत ८१ गावांचा समावेश आहे. गोदावरी नदीच्या काठावरील १५ गावे वगळता इतर क्षेत्र कोरडवाहू आहे. दुष्काळ पडल्याने शेतातील कामे बंद झाली आहेत. तसेच गावात व शिवारात मजुरांच्या हाताला कामच शिल्लक राहिलेले नाही.पंचायत समितीने अजूनही रोजगार हमीच्या एकाही कामाला सुरुवात केलेली नाही. याचा फटका मजुरांना बसत आहे. दुष्काळाची दाहकता वाढत असतानाही प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे.गावात काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेत मजूरवर्ग सापडला आहे. बहुतांश कुटुंबियांनी ऊसतोडीच्या कामासाठी घर सोडले आहे. तर मजूर सध्या कामाच्या शोधात पुणे, मुंबई, औरंगाबाद, नांदेड या शहरांकडे धाव घेत आहेत.
परभणी : कामासाठी मजुरांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 1:00 AM