परभणीत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांसोबत खासदार जाधव यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 01:45 PM2018-07-04T13:45:08+5:302018-07-04T13:46:17+5:30
पीक विमा न मिळाल्याने येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी १० वाजेपासून खा.बंडू जाधव यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे.
परभणी : पीक विमा न मिळाल्याने येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी १० वाजेपासून खा.बंडू जाधव यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे.
रिलायन्स पीक विमा कंपनीने मनमानी कारभार करीत जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवले. या प्रश्नावर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० दिवसांपासून साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला सर्वपक्षीय समर्थन मिळत असून, बुधवारी सकाळी १० वाजता खा.बंडू जाधव हे उपोषणस्थळी दाखल झाले.
यावेळी खा.बंडू जाधव यांच्यासमवेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री सुरेश वरपूडकर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, जि.प.तील गटनेते राम खराबे, माजी सभापती गणेश घाटगे, संतोष मुरकुटे, सदाशिव देशमुख, मोंढा व्यापारी असोसिएशनतर्फे रमेश देशमुख तसेच काँग्रेसचे जि.प.तील गटनेते श्रीनिवास जोगदंड, जि.प. सदस्य डॉ.सुभाष कदम, कॉ.राजन क्षीरसागर, विलास बाबर आदींची उपस्थिती होती. खा.बंडू जाधव हे उपोषणास बसल्याने शहरातील विविध भागातून शिवसैनिक रॅलीद्वारे उपोषणस्थळी दाखल होत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयास मोठा बंदोबस्त
बुधवारी दुपारी १ ते ४ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे दोन्ही प्रमुख गेट बंद करण्यात आले असून, दोन्ही गेटवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.