परभणी महानगरपालिका: संगणकीकरणासाठी लवकरच निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:07 AM2018-08-27T00:07:34+5:302018-08-27T00:08:48+5:30
महापालिकेतील सर्व व्यवहार आॅनलाईन करण्यासाठी संगणकीकरणाची प्रक्रिया सुरु झाली असून येत्या आठवडाभरात निविदा प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: महापालिकेतील सर्व व्यवहार आॅनलाईन करण्यासाठी संगणकीकरणाची प्रक्रिया सुरु झाली असून येत्या आठवडाभरात निविदा प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात सर्व व्यवहार आॅनलाईन होत असल्याने महानगरपालिकेनेही यासाठी पाऊले उचलली आहेत. मागील दोन वर्षांपासून संगणकीकरणाचे प्रयत्न सुरु आहेत; परंतु, त्यास अद्याप यश आले नाही. महिनाभरापूर्वी पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत संगणकीकरणाचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावानुसार महापालिकेचे कामकाज संगणकीकृत करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मनपा अंतर्गत वसूल केले जाणारे कर, अंतर्गत कामकाज यासह इतर सेवाही आॅनलाईन करण्याचा महापालिकेचा विचार आहे.
मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संगणकीकरण करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून एजन्सीमार्फत महापालिकेतील कामकाजाचे संगणकीकरण केले जाणार आहे. मनपा वसूल करीत असलेला कर, महापालिकेतील अकाऊंटींग, सॉलिड अॅण्ड वेस्ट मॅनेजमेंट आदी प्रक्रिया आॅनलाईन करण्यासाठी महानगरपालिकेने कंत्राटदारांकडून निविदा मागविण्याचे निश्चित केले आहे. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा दोन्ही बाबी या निविदा प्रक्रियेत समाविष्ट राहतील. निविदा मंजूर झालेल्या एजन्सीने संगणकांसह त्यांचे सॉफ्टवेअर उपलब्ध करुन द्यावयाचे आहे. एजन्सीचा कर्मचारी मनपा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करेल. त्यानंतर महापालिकेतील सर्व व्यवहार आॅनलाईन केले जाणार आहेत. दरम्यान सध्या निविदा प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने प्रशासनात कामकाज सुरु आहे. येत्या आठवडाभरात मनपा प्रशासन निविदा प्रक्रियेद्वारे संगणकीकरणाच्या कामकाजाला सुरुवात करणार आहे. महापालिकेतील सर्व व्यवहार संगणकीकृत झाल्यानंतर शहरवासियांना जलद सेवा मिळतील, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
शासनाचे पोर्टल सुरु
४महानगरपालिकेच्या संदर्भात असलेल्या काही शासकीय योजनांचे पोर्टल मनपात सुरु आहे. त्याअंतर्गत आरटीआय अॅक्टनुसारच्या आॅनलाईन सेवा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे जन्म-मृत्यू प्रमाणपत्र आॅनलाईन देण्याचे पोर्टलही महापालिकेत सध्या सुरु असून १ आॅगस्टपासून बांधकाम परवाना आॅनलाईन सुरु करण्यातत आला आहे. याशिवाय राज्य शासनाचे आपले सरकार पोर्टल आणि केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारेही नागरिकांना आॅनलाईन सेवा उपलब्ध करुन दिली जात आहे.