लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नांदेड विभागातील कमी अंतराच्या प्रवासासाठी लवकरच डेमो मेमो लोकल सुविधा सुरू केली जाणार असल्याची माहिती मराठवाडा रेल्वे महासंघाने दिली आहे़ या संदर्भातील प्रस्तावही रेल्वे विभागाकडे पाठविल्याचेही महासंघाने सांगितले़भारतीय रेल्वे विभागाने संपूर्ण देशभरात पॅसेंजर गाड्यांऐवजी डेमो मेमो गाड्यांचा विस्तार करण्याचे धोरण अवलंबिले आहे़ दक्षिण-मध्य रेल्वे विभागातील नांदेड विभागात डिझेलवर चालणारी डेमो आणि विजेवर चालणारी मेमो लवकरच चालविण्याबाबत रेल्वे बोर्डाकडे शिफारस पाठविली असून, या शिफारसीस मंजुरी मिळाल्यानंतर ही सेवा सुरू केली जाणार आहे़ डेमो-मेमो लोकल गाड्या पॅसेंजरपेक्षा जास्त वेगाच्या आहेत़ त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे़ नांदेड येथून औरंगाबादला जाण्यासाठी ८ तास लागतात़ डेमो-मेमो लोकलने हा प्रवास पाच तासांचा होणार आहे़ सध्या नांदेड विभागात जालना-मनमाड दरम्यान एकच डेमो लोकल चालविण्यात येत आहे़ नांदेड विभागात मुदखेड-जालना, जालना-मनमाड, अकोला-पूर्णा, पूर्णा-लातूर या नवीन डेमो चालविण्याचे नियोजन केले जात आहे़ वरील नियोजन लक्षात घेता मुदखेड-जालना ऐवजी मुदखेड-औरंगाबाद, जालना-मनमाड ऐवजी औरंगाबाद-देवळाली, अकोला -पूर्णा ऐवजी अकोला-नांदेड, हिंगोली-औरंगाबाद, परळी-अकोला, पूर्णा-लातूर ऐवजी नांदेड-लातूर, परभणी-बिदर, परभणी-उस्मानाबाद या नवीन डेमो चालवाव्यात, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्रा़ सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंडे, रितेश जैन, रविंद्र मुथा, डॉ़ राजगोपाल कालानी, हर्ष शहा, शंतनु डोईफोडे, राकेश भट, उमाकांत जोशी, किरण चिद्रवार, अमीत कासलीवाल, संभानाथ काळे, प्रवीण थानवी, नितीन कदम, श्रीकांत गडप्पा, रियाज सय्यद अली, सुनील जोशी, कदीरलाला हाश्मी, अनिल देसाई, दयानंद दीक्षित, फिरोज लाला, ओंकारसिंह ठाकूर आदींनी केली आहे़
परभणी : नांदेड विभागात आता डेमो रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:47 PM