लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पाथरी येथील उपविभागीय अधिकारी व्यंकट कोळी यांना परभणीतील उपजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिसंख्य या पदावर वर्ग करण्यात येत असल्याचे आदेश महसूल विभागाचे उपसचिव डॉ़ माधव वीर यांनी काढले आहेत़उस्मानाबाद येथे अनुसूचित जमाती या प्रवर्गातून व्यंकट कोळी यांची १९८३ मध्ये नियुक्ती झाली होती़ त्यांचे महादेव कोळी या अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र औरंगाबाद येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २१ डिसेंबर २००४ रोजी अवैध ठरविले होते़ सर्वोच्च न्यायालयातील सिव्हील अपिल क्रमांक ८९२८/२०१५ (चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, एफसीआय आणि इतर विरुद्ध बालाराम बहिरा व इतर) व इतर याचिका यामध्ये ६ जुलै २०१७ रोजी जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांना सेवेत संरक्षण देय ठरत नाही, असा निर्णय दिला आहे़ त्या अनुषंगाने शासन निर्णय १५ जून १९९५, २४ जून २००४, ३० जून २००४, ३० जुलै २०१३, २१ आॅक्टोबर २०१५, २१ डिसेंबर २०१९ अन्वये अधिक्रमीत ठरविण्यात आले आहे़ त्यामुळे शासन निर्णय २१ डिसेंबर २०१९ च्या आदेशानुसार या दिनांकापासून पाथरी येथील उपविभागीय अधिकारी व्यंकट कोळी यांना परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी कार्यालयात अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात येत असल्याचे आदेश उपसचिव डॉ़ माधव वीर यांनी २५ फेब्रुवारी २०२० रोजी काढले आहेत़ या आदेशात कोळी हे तात्पुरत्या स्वरुपात ११ महिन्यांकरीता अथवा ते सेवेत राहिले असते तर ज्या दिनांकाला सेवानिवृत्त झाले असते त्या दिनांकापर्यंत या पैकी जे आधी घडेल तोपर्यंत अधिसंख्य पदावर कार्यरत राहतील़ त्यांना या पदावर वर्ग करण्यापूर्वी जेवढे मासिक वेतन व भत्ते मिळत होते तेवढे वेतन व भत्ते पुढील आदेशापर्यंत देण्यात येतील, असेही या आदेशात नमुद केले आहे़
परभणी: व्यंकट कोळी यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 10:48 PM