परभणी : दारू कारखान्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:02 AM2019-01-25T00:02:48+5:302019-01-25T00:04:47+5:30
शहरातील मराठवाडा प्लॉट भागातील जाकेर हुसेन नगर येथे सुरु असलेल्या बनावट दारु निर्मितीच्या कारखान्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने २४ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यात दीड लाख रुपयांची नामांकित कंपनीची बनावट दारु जप्त करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: शहरातील मराठवाडा प्लॉट भागातील जाकेर हुसेन नगर येथे सुरु असलेल्या बनावट दारु निर्मितीच्या कारखान्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने २४ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यात दीड लाख रुपयांची नामांकित कंपनीची बनावट दारु जप्त करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक बुधवारी रात्री गस्त घालत असताना या बनावट दारुच्या कारखान्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता मॅकडॉल व्हिस्कीच्या ४५३ बाटल्या, बनवाट दारु भरण्यासाठी असलेल्या मॅकडॉल कंपनीच्या १२३० बाटल्या, इंम्पेरियल ब्लू कंपनीच्या १७५, रॉयल स्टॅग कंपनीच्या १६०, आॅफीसर चॉईस कंपनीच्या २०, रियल कंपनीच्या ७ रिकाम्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच रिकाम्या बाटल्यांमध्ये दारु सील करण्यासाठी वापरण्यात येत असलेले ६ कटर, एक आरापट्टी, स्क्रु ड्रायव्हर, ब्रश, बनावट दारुच्या बाटल्या सील करण्यासाठी विविध कंपन्यांचे १२३० सील, झाकणे, बॉक्स तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले कागदी पुठ्ठे, एक विना क्रमांकाची दुचाकी, मोबाईल आदी साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी शेख जफर शेख जमीर, किशन सुरेश गायकवाड, शफू, सनी महाराज या चौघांविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राहकांची फसवणूक करुन बेकायदेशीररित्या कारखान्यात दारुचा साठा केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी या संपूर्ण कारवाईमध्ये १ लाख ५७ हजार ६५ रुपयांची बनावट दारु जप्त केली आहे. या कारवाईमुळे अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
दारुच्या रिकाम्या बाटल्या, कंपन्यांचे लेबल असलेले झाकणं आणि सीलच्या सहाय्याने बनावट दारु कंपनीच्या नावाने तयार करण्याचा गंभीर प्रकार पोलिसांच्या कारवाईनंतर समोर आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हनुमान पांचाळ, हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, जगदीश रेड्डी, घनसावंत, कांदे, पूजा भोरगे, मुंडे यांच्या पथकाने केली.
ड्राय डे मुळे केला होता साठा
प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी जिल्ह्यात ड्राय डेचे आदेश काढले जातात. या काळामध्ये दारुची दुकाने बंद ठेवण्यात येतात. या ड्राय डेचा फायदा उठविण्यासाठी परभणीतील या बनावट दारुच्या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारुचा साठा करुन ठेवला होता. ड्राय डे च्या दिवशी जिल्ह्यातील वेगवेगळ्या ढाब्यांवर ही दारु पोहचती करण्याचेही नियोजन आरोपींनी केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. विविध नामांकित कंपन्यांची बनावट दारु जप्त केल्याने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.
५