परभणी : येलदरीतील अतिक्रमण हटविण्यास स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:26 PM2018-10-17T23:26:40+5:302018-10-17T23:27:38+5:30
जिंतूर तालुक्यातील येलदरी कॅम्प येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्यास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी स्थगिती दिली असल्याची माहिती आ़ विजय भांबळे यांनी दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिंतूर तालुक्यातील येलदरी कॅम्प येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्यास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी स्थगिती दिली असल्याची माहिती आ़ विजय भांबळे यांनी दिली़
येलदरी कॅम्प येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवर ५० ते ६० वर्षांपासून ग्रामस्थांनी अतिक्रमणे केली आहेत़ विशेष म्हणजे या जागेवर शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून, येथे घरकूल योजना, पाणीपुरवठा योजना अंमलात आणली आहे़ ग्रामस्थांना रेशनकार्ड व आधार कार्डही देण्यात आले आहेत़ ही जागा शासनाची असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी येथील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले होते़
त्यानंतर आ़ विजय भांबळे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या समवेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची भेट घेतली़ हा संवेदनशील विषय असल्याने सहानूभूतीपूर्वक विचार करावा व अतिक्रमणे कायम करावीत, अशी मागणी केली़ त्यानंतर राज्यमंत्री राठोड यांनी जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला स्थगिती देत हे प्रकरण विभागीयस्तरावर हताळण्याचे आदेश दिले़
या संदर्भातील आदेशाची प्रत बुधवारी मुंबई येथे राज्यमंत्री राठोड यांच्याकडून माजी जि़प़ सदस्य डॉ़ अशोक खके, विजयकुमार वाकळे, आ़ भांबळे यांचे स्वीयसहाय्यक रविकुमार होडबे यांनी स्वीकारली़