परभणी : २६ लाखांतून होणार रस्त्यांची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:52 AM2018-12-16T00:52:32+5:302018-12-16T00:52:55+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ३ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २६ लाख ४५ हजार ८९० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या रस्ता कामाच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने काढण्यात आल्या आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ३ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २६ लाख ४५ हजार ८९० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या रस्ता कामाच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने काढण्यात आल्या आहेत़
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पाथरी-सिंगणापूर-ताडकळस-पूर्णामार्गे नांदेड या राज्य मार्ग ६१ च्या २७८ ते २८८ आणि २८८ ते ३०१ या २३ किमीच्या रस्ता कामासाठी दोन टप्प्यात ७ लाख ६१ हजार ३४३ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या रस्ता कामाच्या निविदा काढण्यात आल्या असून, संबंधित कंत्राटदारांना २८ डिसेंबरपर्यंत या कामासाठी निविदा दाखल करावयाच्या आहेत़ त्यानंतर नियमाप्रमाणे रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात येणार आहे़ तसेच गंगाखेड-इसाद-सुप्पा-पिंपळदरी ते जिल्हा हद्द या राज्य मार्ग २४८ च्या २७ किमी अंतराच्या रस्ता दुरुस्तीसाठी ९ लाख ९६ हजार ३५८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ रस्ता दुरुस्तीचे हे काम तीन महिन्यांत पूर्ण करायचे असून, ते मजूर सोसायट्यांना देण्यात येणार आहे़ याशिवाय मानवत तालुक्यातील सारणपूर येथील सिमेंट रस्त्याच्या कामासाठी ८ लाख ८८ हजार १८९ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या दोन्ही कामांच्या निविदा १४ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आल्या असून, २८ डिसेंबरपर्यंत इच्छुक कंत्राटदारांना निविदा दाखल करता येणार आहेत़ ४ जानेवारी या निविदा उघडण्यात येणार आहेत़
सभामंडपासाठी २१ लाख मंजूर
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिंतूर तालुक्यातील घेवंडा व सावंगी भांबळे आणि सेलू तालुक्यातील पिंपळगाव येथे सभामंडप उभारण्यात येणार आहे़ त्यासाठी एकूण २० लाख ९६ हजार १५५ रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे़ त्यामध्ये घेवंडा येथील सभामंडपासाठी ६ लाख १४ हजार ८७२ रुपये, सावंगी भांबळे येथील सभामंडपासाठी ८ लाख ८६ हजार ४९१ रुपये आणि पिंपळगाव येथील सभामंडपासाठी ५ लाख ९४ हजार ७९२ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या तिन्ही सभामंडपाच्या कामाच्या निविदाही १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या असून, इच्छुक कंत्राटदारांना २८ डिसेंबरपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत़ त्यानंतर ४ जानेवारी रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत़ त्यानंतर या कामांचा कंत्राटदार निश्चित होणार आहे़