परभणी : कार्यालय चालते रेल्वे वेळापत्रकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:33 AM2018-11-03T00:33:06+5:302018-11-03T00:33:52+5:30
तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना पंचायत समितीसारख्या महत्त्वाच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अधिकारी व विविध विभागातील कर्मचारी फिरकत नसल्याचे चित्र शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. दरम्यान, अनेक ग्रामस्थ कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करीत असल्याचे पहावयास मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना पंचायत समितीसारख्या महत्त्वाच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अधिकारी व विविध विभागातील कर्मचारी फिरकत नसल्याचे चित्र शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. दरम्यान, अनेक ग्रामस्थ कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करीत असल्याचे पहावयास मिळाले.
येथील पंचायत समिती कार्यालयातून ग्रामीण भागातील विविध योजना राबविल्या जातात. त्यामुळे पंचायत समिती कार्यालयात लाभार्थी व ग्रामस्थांची गर्दी असते;परंतु, येथील पंचायत समितीला अनेक महिन्यांपासून नियमित गटविकास अधिकारी मिळाले नाहीत. इतर तालुक्याच्या गटविकास अधिकाºयांना सेलूचा पदभार देऊन कामकाज केले जात आहे. परिणामी प्रभारी बीडीओ आठवड्यातून एक ते दोन दिवस काही तासांची कार्यालयात हजेरी लावून जातात. यामुळे शेकडो लाभार्थ्यांना ताटकळत बसावे लागते. तसेच अधिकारी व कर्मचाºयांना रान मोकळे मिळते.
पंचायत समिती कार्यालयातील पंचायत विभाग, बांधकाम विभाग, लेखा विभाग, मग्रारोहचो विभाग, आरोग्य, घरकूल आवास योजना व इतर विभागातील काळात शुक्रवारी, दुपारी १२ वाजेर्पंत शुकशुकाट होता. केवळ लेखा व सामान्य अस्थापना विभागातील चार ते पाच कर्मचारी टेबलवर कामकाज करताना दिसून आले.
बांधकाम विभागातील एक कनिष्ठ सहाय्यक वगळता एकही अभियंता कक्षात नव्हता. पंचायत विभागातील सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. तर सभापती व पदाधिकाºयांच्या कक्षाला देखील कुलूप होते.
दरम्यान, दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागात पाणी, चारा व केंद्र, राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य ग्रामस्थांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पं.स. कार्यालयाची आहे;परंतु, कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने कार्यालयाचे कामकाज ढेपाळल्याचे चित्र दिसून आले.
कार्यालय चालते रेल्वे वेळापत्रकावर
४पंचायत समिती कार्यालयातील बहुतांश कर्मचारी व अधिकारी परभणी येथून ये-जा करतात. दुपारी बारानंतर तपोवन रेल्वे गाडीने कार्यालयात पोहचतात. तर दुपारी साडेतीनच्या तपोवनने परत जातात. त्यामुळे तीनच तास कर्मचारी कार्यालयात उपलब्ध असतात. अनेक अधिकारी व कर्मचारी बैठकीच्या नावावर कार्र्यालयाला दांडी मारीत असल्याची चर्चा आहे.