परभणी : शाळांना मिळणार गॅस जोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:45 AM2020-02-15T00:45:29+5:302020-02-15T00:46:03+5:30
शालेय पोषण आहार शिजवून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना गॅस जोडणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून, या संदर्भातील माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शालेय पोषण आहार शिजवून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना गॅस जोडणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून, या संदर्भातील माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे़
जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार शिजवून देत असताना गॅस जोडण्या नसल्याची बाब समोर आली होती़ पारंपारिक पद्धतीने सरपनाचा वापर करून पोषण आहार शिजवून दिला जात होता़ यामुळे एकीकडे प्रदूषणात वाढ होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही धुरामुळे परिणाम होत होता़ या अनुषंगाने या शाळांना शालेय पोषण आहार शिजवून देण्यासाठी गॅस जोडणी देण्याची मागणी करण्यात येत होती़ त्यानुसार शालेय पोषण आहार योजनेच्या २०२०-२१ च्या वार्षिक कार्यक्रम व अंदाजपत्रक मंजुरीसाठी केंद्र शासनाच्या मान्यता मंडळाची बैठक होणार आहे़
त्या बैठकीत याबातचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे़ त्या अनुषंगाने राज्यातील ज्या शाळांमध्ये आहार शिजविण्यासाठी गॅस कनेक्शन नाही, अशा शाळांची माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत़ या संदर्भातील आदेश वित्त व लेखा विभागाच्या उपसंचालक पद्मश्री तळदेकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत़