परभणी : विद्यापीठास ५३ कोटी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:45 PM2019-01-30T23:45:43+5:302019-01-30T23:47:19+5:30
कृषी क्षेत्रातील संशोधनाबरोबरच शिक्षण आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या सहाय्यक अनुदानापोटी राज्य शासनाने येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला ५३ कोटी ८४ लाख २६ हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कृषी क्षेत्रातील संशोधनाबरोबरच शिक्षण आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या सहाय्यक अनुदानापोटी राज्य शासनाने येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला ५३ कोटी ८४ लाख २६ हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे़
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये कृषी संशोधन आणि इतर अनुषंगीक बाबींंसाठी महाराष्ट्र शासनाकडून निधीची तरतूद केली जाते. या अंतर्गत कृषी पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाने २९ जानेवारी रोजी एका अध्यादेशाद्वारे चारही विद्यापीठांसाठी ७२२ कोटी १९ लाख ८९ हजार रुपयांचा निधी वितरित केला असून, त्यात परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या वाट्याला ५३ कोटी ८४ लाख रुपये प्राप्त झाले आहेत़ तर काही निधी चारही विद्यापीठांतर्गत एकत्रित स्वरुपात वितरित करण्यात आला आहे़ या आदेशानुसार कृषी विषक संशोधन आणि शिक्षण या कार्यासाठी कृषी विद्यापीठाला सहाय्यक अनुदान म्हणून १७३ कोटी ६ लाख १६ हजार रुपयांची तरतूद केली होती़ डिसेंबर अखेरपर्यंत १२१ कोटी १४ लाख ३१ हजार रुपये विद्यापीठाला प्राप्त झाले असून, ५१ कोटी १६ लाख ८ हजार रुपयांचा निधी या अध्यादेशाद्वारे वितरित करण्यात आला आहे़ तसेच पशूसंवर्धन विभागाच्या अंतर्गत सहाय्यक अनुदान म्हणून ६४ लाख २२ हजार रुपये, कर्मचाºयांना अंशदानाची रक्कम देण्यासाठी सहाय्यक अनुदान म्हणून २ कोटी ३ लाख ९६ हजार रुपये एवढा निधी वितरित केला आहे़ विद्यापीठांच्या खर्चाच्या तुलनेमध्ये ९० टक्केच्या मर्यादेत हा निधी वितरित करण्यात आला असून, कार्यक्रमांतर्गत येणाºया योजनांसाठी योजनानिहाय प्रशासकीय व वित्तीय खर्चाच्या मंजुरीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित झाल्यानंतरच ८० टक्केच्या मर्यादेत प्रत्यक्ष निधीचे वितरण केले जाणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे़ कृषी, पशूसंवर्धन विभागाचे उपसचिव डॉ़ किरण पाटील यांनी २९ जानेवारी रोजी एका अध्यादेशाद्वारे हा निधी वितरित केला आहे़
चारही विद्यापीठांना राज्य शासनाने निधीचे वितरण केले असून, या प्राप्त झालेल्या निधीमधून कर्मचाºयांचे वेतन, सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या अंशदानाच्या रक्कमा अदा केल्या जाणार आहेत़ हा सर्व निधी परभणी येथील उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अंतर्गत वितरित करण्यात आला आहे़
एकंदर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला संशोधन, शिक्षण आणि कर्मचाºयांच्या वेतनापोटी निधी प्राप्त झाल्याने या कामांना गती मिळणार आहे़ आगामी काळात आचारसंहिता लागू होणार असल्याने त्यापूर्वीच निधी प्राप्त झाला आहे़
गृहनिर्माणासाठी २२ लाख
कृषी विद्यापीठातील कर्मचाºयांच्या घरांचे बांधकाम करण्यासाठी अग्रीम रक्कम या आदेशाद्वारे मंजूर करण्यात आली आहे़ अर्थ संकल्पीय तरतूदीमध्ये चारही कृषी विद्यापीठांसाठी ७६ लाख ४३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती़ त्यापैकी डिसेंबर अखेरपर्यंत ५३ लाख ५० हजार रुपये या विद्यापीठांना वितरित करण्यात आले असून, उर्वरित शिल्लक राहिलेले २२ लाख ९२ हजार रुपये या आदेशान्वये वितरित करण्यात आले आहेत़ या रक्कमेमधून चारही विद्यापीठांमधील कर्मचाºयांच्या निवासस्थानाचा प्रश्न सुटणार आहे़
प्राप्त झालेला निधी शिक्षण आणि संशोधन कार्यासाठी वापरला जाणार असून, निधी वापरतानाही निकष घालून देण्यात आले आहेत़ त्या निकषानुसारच विद्यापीठांना हा निधी खर्च करावा लागणार आहे़
दुग्ध विकासाला निधीच मिळेना
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत मत्स्य व्यवसायाला मुभा नसली तरी मराठवाडा विभागामध्ये दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे़ या व्यवसायाला चालना देण्यासाठी विद्यापीठासाठी कुठलीही तरतूद करण्यात आली नाही़ मत्स्य व्यवसायासाठी डॉ़ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला ३ कोटी ८२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे़ तर डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला ११ लाख ११ हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे़ मात्र परभणी येथील कृषी विद्यापीठाला या विभागात निधी मिळाला नाही़