लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जमिनीतील पाणीपातळीत मोठी घट झाली असताना जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून दोन ते तीन वेळेस पाणी सोडल्याने पाणीपातळीत तर वाढ झालीच; परंतु, दुष्काळाची दाहकताही कमी झाली आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाण्याने दुष्काळी भागाला तारल्याचे दिसून येत आहे.पाथरी तालुक्यात यावर्षीच्या सुरुवातीला दोन महिने पाऊस पडला. त्यानंतर पावसाने पुढील दोन महिने पूर्णत: खंड दिला. परिणामी खरीप हंगामातील पिके धोक्यात आली. पिकांना चांगला उतारा आला नाही. रबी हंगामातील पिकांची तर पावसाअभावी पेरणीच झाली नाही. दुष्काळी भागात शेतकऱ्यांना शेतातील पिके वाचविण्यासाठी चांगलीच धडपड करावी लागली. जलस्त्रोताचे पाणी कमी झाल्याने बारमाही बागायती पिके घेणारे शेतकरीही अडचणीत सापडले होते.पाथरी तालुक्यात जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा आहे. तर गोदावरी नदीच्या पात्रात ढालेगाव आणि मुदगल येथे दोन उच्च पातळीचे बंधारे आहेत. या भागात पाऊस कमी पडला असला तरी वरच्या भागात पडलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर येऊन पहिल्या दोन महिन्यात दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना या पाण्याचा लाभ झाला. राज्य शासनाने पंचनामे आणि सर्वेक्षणाच्या आधारे पाथरी तालुका गंभीर दुष्काळाच्या यादीत जाहीर केला. शासनाकडून दुष्काळी भागात जाहीर करण्यात आलेल्या ८ सवलतींमध्ये फारसा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही.या तालुक्यात जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्याची सुरुवातीपासूनच मागणी केली जात होती. नोव्हेंबरमध्ये सुरुवातीला डाव्या कालव्यात संरक्षित पाणी पाळी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सिंचन होणाºया भागात रबीची पेरणीही झाली.या भागात शेतकºयांनी उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. गत वर्षी लागवड केलेल्या उसालाही पाण्याची आवश्यकता होती. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत जायकवाडी धरणाचे पाणी या भागातील शेतकºयांना मिळाले. त्यातच जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जायकवाडी धरणातून एक पाणी आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे याही पाण्याचा या भागातील शेतकºयांना लाभ झाला आहे. तसेच परिसरातील भूजल पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे दुष्काळग्रस्त भागाला काही प्रमाणात दिलासा मिळाला.४ हजार हेक्टरवरील पिकांना फायदा...दोन महिने पावसाने खंड दिल्यामुळे पाथरी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ परिस्थितीत शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळाच्या झळा सहन करीत असताना जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून या भागात पाणी सोडल्यामुळे काही अंशी दुष्काळाची दाहकता कमी झाली आहे. सध्या तालुक्यात एकही टँकर सुरू नाही. केवळ पाच गावांत बोअर आणि विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. त्याचबरोबर डाव्या काळव्यातील पाण्यामुळे शेती पिकांना लाभ झाला आहे. ४ हजार हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. त्याचबरोबर भूजल पाणी पातळी वाढली आहे. जलस्रोतांना पाणी आल्याने पाणी टंचाईवर मात होत असल्याचे दिसत आहे.
परभणी : ‘जायकवाडी’च्या पाण्याने दुष्काळी भागाला तारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 11:59 PM