परभणी : जन्मभूमीच्या नावाने स्वागत कमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 11:54 PM2020-01-22T23:54:32+5:302020-01-22T23:55:11+5:30
पाथरी हेच संत साईबाबा यांचे जन्मस्थळ असल्याचा दावा कायम ठेवत येथील नगरपालिकेने आता राष्टÑीय आणि राज्य महामार्गावर ‘साईबाबांची जन्मभूमी’ या नावाने पाच स्वागत कमानी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : पाथरी हेच संत साईबाबा यांचे जन्मस्थळ असल्याचा दावा कायम ठेवत येथील नगरपालिकेने आता राष्टÑीय आणि राज्य महामार्गावर ‘साईबाबांची जन्मभूमी’ या नावाने पाच स्वागत कमानी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साई जन्मभूमीच्या आराखड्याला मान्यता दिल्यानंतर शिर्डीकरांनी विरोध सुरू केला. त्यामुळे पाथरीच्या जन्मभूमीची चर्चा आता देशपातळीवर सुरू झाली आहे. सध्या राज्यासह राज्याबाहेरील भाविकांचा पाथरीकडे ओढा वाढला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिर्डीवासीय शांत झाले असले तरी पाथरीकरांनी अजूनही साई जन्मभूमीचा दावा सोडला नाही. त्यातूनच पाथरी-आष्टी, पाथरी- सोनपेठ, पाथरी- सेलू, पाथरी- पोखर्णी या चार राज्य महामार्गावर आणि राष्टÑीय महामार्गावर स्वागत कमानी उभारण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून त्यासाठी ४० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली जाणार आहे.
साई जन्मभूमीचा विषय देशपातळीवर गेला आहे. आमचा दावा कायम असून, नगरपालिकेकडून नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रमुख रस्त्यावर ‘साई जन्मभूमी पाथरीत साई भक्तांचे स्वागत’ अशा कमानी उभारल्या जाणार आहेत. पाच कमानींसाठी नाविण्यपूर्ण योजनेतून खर्च केला जाणार असून, लवकरच हे काम हाती घेतले जाणार आहे.
-आ.बाबाजानी दुर्राणी
साईबाबा यांची जन्मभूमी पाथरी असल्याने पाथरी नगरपालिकेने हा स्वागत कमानी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच हे काम पूर्ण केले जाणार आहे.
-हन्नानखान दुर्राणी, उपनगराध्यक्ष