लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: कोणी लोकशाहीचे बुड रुजण्या ओसरी मागते, कोळसा, बोफोर्स, चारा पोटभर खा तुम्ही, ही उपाशी झोपडी तर भाकरी मागते, या गझलेने उपस्थितांना अंतर्मूख होण्यास भाग पाडले.येथील बी.रघुनाथ महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय युवक-युवती नेतृत्व विकास शिबिरात गझलांबरोबरच अनेक प्रेम कवितांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गझलकार अरविंद सगर यांनी सादर केलेली वरील गझल उपस्थितांना चांगलीच भावली. ग्रामीण कवि राजेश रेवले यांनी ‘सागराला संथ लाटा गोंजारती फेसातून, तशी सखे तुझी बोटे फिरव माझ्या केसातून’ या कवितेने युवकांमध्ये उत्साह संचारला. तर सुरेश हिवाळे यांनी किती काळेभोर सखे तुझे केस, कलेजा खल्लास होतो माझा केसांमुळे तुझे रुप उजळते, मनही भुलते, माझे राणी ही कविता सादर करुन उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या.नाट्यकलावंत नागेश कुलकर्णी यांनी बापुची काठी या कवितेतून अविवेक, अविचारावर आसूड ओढले. राही कदम यांनी अपराध या कवितेतून कन्यारत्नाचे स्वागत करण्याचे आवाहन केले. त्र्यंबक वडसकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी त्यांनी बा विवेकानंदा ही कविता सादर केली. महिला अत्याचाराने गाठला कळस, कावरी-बावरी झालीय अंगणातील तुळस, घरातल्या सावित्रीला जपायच कस, बा विवेकानंदा, तुम्हीच सांगा आम्ही बंधू आणि भगिनींनो म्हणायचं कस या कवितेतून सद्यस्थितीवर भाष्य केले.कवि संतोष नारायणकर, संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.अशोक पाठक यांनीही कवितांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुरेश भालेराव यांनी प्रास्ताविक केले. प्रा.भगवान काळे यांनी आभार मानले.
परभणीत कविसंमेलन : ही उपाशी झोपडी तर भाकरी मागते...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:09 AM