परभणीचे सुपुत्र जवान रघुनाथ चिमले यांना त्रिपुरा येथे विरगती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 12:14 PM2023-10-02T12:14:48+5:302023-10-02T12:16:43+5:30
परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील सिरपूर येथे होणार अंत्यसंस्कार
पालम : तालुक्यातील सिरपूर येथील भूमिपुत्र रघुनाथ मोतीराम चिमले (वय ४०) यांना त्रिपुरा येथे भारतीय सीमा सुरक्षा दलात कर्तव्यावर असताना रविवारी ( दि. १ ) वीरगती प्राप्त झाली. आजारामुळे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. यामुळे चिमले कुटुंबीयांसह सिरपूर गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रघुनाथ चिमले २००३ मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती झाले. जम्मू व कश्मीर, आसाम, पश्चिम बंगाल आदी राज्यात त्यांनी २० वर्षे सेवा बजावली. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी त्यांना आजाराने गाठले. आठ दिवसांपूर्वी त्रिपुरात कर्तव्यावर असताना प्रकृती बिघडल्याने त्यांना आगरताळा येथील सैनिकी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.१० मिनिटांनी रघुनाथ यांची प्राणज्योत मालवली. रघुनाथ यांनी भारतमातेची दीर्घकाळ सेवा केली. मात्र, प्रकृती अस्वस्थामुळे ते स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या विचारात होते. त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
मंगळवारी गावी होणार अंत्यसंस्कार
आज दुपारी उत्तरीय तपासणीनंतर पार्थिव सीमा सुरक्षा बलाच्या ताब्यात दिले जाईल. त्यानंतर कोलकत्याहून विमानाद्वारे मुंबई किंवा औरंगाबाद येथे मंगळवारी रघुनाथ चिमले यांचा पार्थिव मूळ गाव सिरपूर येथे आणण्यात येईल अशी माहिती चांदुजी चिमले यांनी दिली.