परभणी : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयासह निमशासकीय कार्यालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेची तपासणी आणि परीक्षण (फायर ऑडिट) करून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिल्या आहेत.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हास्तर समिती तसेच परीक्षण व तपासणी समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले. या दोन्ही समित्यांमार्फत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालये तसेच शाळा, महाविद्यालय, समाज कल्याण विभागाचे विद्यार्थी वसतिगृह, मंगल कार्यालय हॉल, आदींची अग्निसुरक्षा परीक्षण व विद्युत सुरक्षा परीक्षण करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्याचप्रमाणे या तपासणीत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याच्याही सूचना त्यांनी केला. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर, आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, जिल्हा प्रशासन अधिकारी जयवंत सोनवणे, शिक्षणाधिकारी सूचिता पाटेकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके, आदींची उपस्थिती होती.