परभणी : जिनिंग प्रेसिंग चालकांचे आंदोलन आणि संक्रांतीमुळे कापूस खरेदी केंद्र चार दिवस बंद राहणार असले, तरी या काळात प्रभारी केंद्रप्रमुखांनी केंद्र बंद न ठेवता प्रलंबित कामे करावीत, अशा सूचना भारतीय कपास निगमच्या उपमहाप्रबंधकांनी दिल्या आहेत.
जिनिंग प्रेसिंग चालकांनी त्यांच्या मागण्यांसाठी ११ व १२ जानेवारी रोजी राज्यातील कापूस खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे १३ व १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण असल्याने सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र बंद राहणार आहेत. चार दिवसांसाठी कापूस खरेदी बंद असून, या काळात केंद्र प्रमुखांनी हे केंद्र बंद ठेवू नये. केंद्रावर हेल्प डेस्क सुरू करावा, प्रमुख अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कार्यालय सोडू नये, कर्मचाऱ्यांचे पगार, शेतकऱ्यांचे पेमेंट आणि इतर प्रलंबित कामे या काळामध्ये करावीत, अशा सूचना भारतीय कपास निगमच्या उपमहाप्रबंधकांनी दिल्या आहेत. परभणी जिल्ह्यात मानवत, सेलू, ताडकळस, पूर्णा, सोनपेठ आणि जिंतूर या ठिकाणी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. या केंद्रांवर चार दिवस कापूस खरेदी बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमहाप्रबंधक यांनी वरील सूचना केल्या आहेत.