जिंतूर : तालुक्यातील येलदरी येथे 'अंदर-बाहर' नावाचा जुगार खेळत असताना 13 जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यावेळी रोख तीन लाख 38 हजार 910 रुपये आणि 4 लाख 69 हजार 810 रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी श्रवण दत्त यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गुरुवारी (दि. 17 ) रात्री नऊच्या सुमारास येलदरी येथील अनंता उर्फ बाळू माकोडे याच्या नवीन बांधकाम असलेल्या घरात जुगार खेळत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी श्रवण दत्त यांना मिळाली. यावरून त्यांनी जिंतूर पोलीस स्थानकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, उपनिरीक्षक पोलीस रवी मुंडे, पोलिस नायक रमन पारपल्ली, गजानन शिरसागर माधव गोरे ,गजानन रोकडे ,ज्ञानेश्वर कोकाटे, राम पोळ, राजकुमार पुंडगे, संदीप सोनटक्के, आनंद पांचाळ, सुरेश हाके आदी कर्मचाऱ्यांच्या पथकासोबत माकोडे याच्या घरावर झाड टाकली. यावेळी 'अंदर-बाहर' नावाचा जुगार खेळत असताना काही जण आढळून आले.
पोलिसांनी अनंत ऊर्फ बाळू माकोडे, विठ्ठल धोंडुजी टाकरस, राहुल राधेश्याम जयस्वाल , नजीर खान, मिरखान पठाण, गौतम कुंडलिक घनसावंत, सचिन बाबुराव राठोड (सर्व रा. येलदरी ), लक्ष्मण आश्रुबा मगर ,गिरधारीलाल जयस्वाल ( रा. ईटोली) , बाळासाहेब पांडुरंग डोंगरे, गणेश शंकर राठोड (रा. परभणी ), गणेश गोपीनाथ पवार ( रा. घेवडा), विलास चत्रू चव्हाण ( रा. केहाळ तांडा ), रामकिसन मुंजाजीराव गडदे (रा. ब्रह्मवाडी ) यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख 3 लाख 38 हजार 910. मोबाईल 14 यांची किंमत 33 हजार 900 ,तीन मोटरसायकल 97 हजार रुपये असा एकूण 4 लाख 69 हजार 810 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. यासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिंतूर पोलिसात मुंबई जुगार कायदा ,आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.